प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; विद्यार्थ्यांनी एक हजार झाडांना बांधल्या राख्या
पुणे : भावा-बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. एका दिवसात एक हजार राख्या बनवून एका दोन तासात एक हजार विद्यार्थ्यांनी एक झाडांना राखी बांधण्याचा, तसेच दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एक हजार नारळ वितरित करण्याचा आणि सैनिक व सामाजिक सुरक्षा करणाऱ्या भारतीयांसाठी एक हजार पत्रे लिहिण्याचा विक्रम ‘सूर्यदत्त’मध्ये नोंदवला गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने यशस्वी केलेल्या भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला या राख्या समर्पित करण्यात आल्या असून, चांद्रयान-३ च्या संकल्पनेवर आकर्षक राख्या बनवण्यात आल्या होत्या.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये शुक्रवारी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या १०० विद्यार्थ्यांनी कल्पक, सुंदर व आकर्षक एक हजार राख्या एक दिवसात बनवल्या. ‘सूर्यदत्त’च्या कॅम्पसमधील शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या राख्या एक हजार झाडाला बांधल्या. आपल्याला ऑक्सीजन, सावली, फळे-फुले देणाऱ्या या वृक्षरूपी बंधूना राखी बांधून त्याचे रक्षण करण्याचा संकल्प सर्वानी घेतला. अतिशय उत्साहाने लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच यामध्ये सहभाग नोंदवला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या संकल्पनेतून हा त्रिवेणी संगम साधला गेला. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा सु षमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रशांत पितालिया, विभागप्रमुख प्रा. मनीषा कुंभार, फॅशन टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुख प्रा. पूजा विश्वकर्मा, प्रा. मोनिका कर्वे आदी उपस्थित होते. सेवाव्रत फाउंडेशनचे प्रदीप देवकुळे, श्री शनी मारुती बालगणेश मंडळाचे सचिन पवार, विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे विशाल भेलके, पतित पावन संघटनेचे मनोज नायर, आई फाउंडेशनचे पार्थ बोनाकृती आदी सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करून त्यांना नारळ सुपूर्त करण्यात आले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सामाजिक, राष्ट्रभक्तीच्या भावनेतून दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. फॅशन डिझाईनच्या मुलामुलींनी स्वतःच्या हाताने चांद्रयान-३ मोहिमेचे दर्शन घडवणाऱ्या राख्या बनवल्या. सूर्यदत्तच्या सर्वच शाखांमधील विद्यार्थ्यांनी या राख्या झाडांना बांधल्या. झाडांवरील प्रेम व्यक्त करण्याचा हा उपक्रम आहे. यासह सैनिक, पोलीस, संरक्षण कर्मचारी यांच्याबद्दल मुलांच्या मनातील भावना पत्रलेखनातून मांडल्या आहेत. ही पत्रे पोलीस आयुक्त, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख यांच्याकडे सोपविण्यात येणार आहेत. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून सामाजिक संस्थांना नारळ देण्याचा स्तुत्य उपक्रम आज राबवला, या सगळ्या उपक्रमाबाबत खूप आनंद आणि समाधान वाटते.”
जे वृक्ष भाऊ म्हणून आपल्याला प्राणवायू देतात, फळे व फुले देतात, उन्हापासून रक्षणासाठी सावली देतात, अशा वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी ‘सूर्यदत्त’ने राबवलेल्या या उपक्रमात आम्हाला सहभागी होता आले. आमच्या वृक्षरूपी भावाला राखी बांधता आली, याचा मनोमन आनंद होत असल्याची भावना विद्यार्थी व शिक्षकांनी व्यक्त केली. तसेच या झाडांचे रक्षण करण्याचा संकल्प उपस्थित सर्वानी घेतला. सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी वृक्ष रक्षाबंधन, नारळ वाटप व पत्रलेखन या तीनही उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.