राउंड टेबल इंडियातर्फे दृष्टिहीनांसाठी रविवारी ‘बियाँड साइट’ अनोख्या कार रॅलीचे आयोजन

राउंड टेबल इंडियातर्फे दृष्टिहीनांसाठी रविवारी ‘बियाँड साइट’ अनोख्या कार रॅलीचे आयोजन

 
पुणे, दि. २६-  सामाजिक समावेशकतेला चालना देण्यासाठी राउंड टेबल इंडिया या संस्थेतर्फे पुण्यात दृष्टीहिनांसाठी ‘बियॉंड साईट’, ही आगळीवेगळी कार रॅली  ( Round Table India organizes ‘Beyond Sight’, a unique car rally for the visually impaired in Pune)   आयोजित करण्यात आली आहे. ही कार रॅली येत्या रविवारी (ता. २९) रोजी सकाळी १० वाजता द फर्न क्लब, अमनोरा पार्क, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती राउंड टेबल इंडियाचे (एरिया १५) अध्यक्ष अंशुल मंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या प्रकल्प संचालिका डॉ. आर्वा चिनीकमवाला, राउंड टेबल इंडियाचे सुमित गुप्ता, रोनक पतोडीया, मनन शहा, गुरप्रीत सिंग, इंद्रोनील चॅटर्जी, तरुण सिंग आदी उपस्थित होते.
अंशुल मंगल म्हणाले, “या रॅलीमध्ये ५० कारचालक सहभागी होणार आहेत. दृष्टिक्षम व्यक्ती कार चालवणार आहे, तर दृष्टिहीन व्यक्ती स्मार्टफोनवरून मिळणाऱ्या सूचना ऐकून ड्रायव्हरला मार्ग दाखवणार आहे. दोन तासाचा वेळ, २४ किलोमीटर अंतर असलेल्या या रॅलीचा मार्ग अमनोरा पार्क, खराडी बायपास, शक्ती स्पोर्ट्स, हयात इन्स्टा, गोल्ड ऍडलॅब चौक, वर्दे सोसायटी, गुंजन टॉकीज, कोरेगाव पार्क, वेस्टीन हॉटेल, मुंढवा चौक, मगरपट्टामार्गे अमनोरा पार्क असा आहे. ‘बियाँड साइट’ ही केवळ स्पर्धा नाही, तर दृष्टिहीन व्यक्तींच्या कौशल्यावर विश्वास दाखवण्याचा आणि त्यांच्याविषयी असलेल्या रूढ कल्पनांना आव्हान देण्याचा उपक्रम आहे. संथ गतीने शहरातील ठराविक मार्गावर ही रॅली पार पडणार असून, दृष्टिहीन व्यक्तींची दिशा ज्ञान, स्थानिक समज आणि संवाद कौशल्ये यांचा प्रत्यय इथे येणार आहे.”
“राउंड टेबल इंडियामध्ये आम्ही संधी निर्माण करत समाजातील वंचित घटकांना सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो. ‘बियाँड साइट’ ही आमच्या समावेशकतेवरील कटिबद्धतेचे आणि दृष्टिहीनांच्या क्षमतेवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. या उपक्रमामध्ये विविध पार्श्वभूमीचे नागरिक सहभागी होणार असून, ड्रायव्हिंगबद्दलची आवड आणि दृष्टिहीन समुदायाबद्दलचा आदर यांच्या जोरावर ते एकत्र येणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे, तर ‘अपंगत्व म्हणजे असमर्थता नव्हे’ हा सामाजिक संदेशही दिला जाणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

ही फक्त रॅली नाही, तर दृष्टिहीनांच्या अद्भुत कौशल्यांना ओळख देणारे व्यासपीठ आहे. ‘बियाँड साइट’च्या माध्यमातून अनेकांचे दृष्टिकोन बदलतील आणि दृष्टिहीनांसाठी अधिक समावेशक संधी निर्माण होतील, अशी आशा आहे,” असे डॉ. आर्वा चिनीकमवाला यांनी सांगितले. या उपक्रमाविषयी अधिक माहिती www.roundtableindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *