महागाईने मजूर अड्ड्यावरील कामगारांवर उपासमारीची वेळ

महागाईने मजूर अड्ड्यावरील कामगारांवर उपासमारीची वेळ

रोहन सुरवसे-पाटील यांची मदतीची मागणी; राज्यकर्ते एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग असल्याची टीका

पुणे: शहर आणि उपनगरातील मजूर अड्ड्यावर दिवसेंदिवस रोजगार मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मजुरांना आठवड्यातून तीन-चार दिवसच रोजगार मिळत आहे. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे महागाईने कळस गाठला आहे, तर दुसरीकडे रोजगार मिळत नाही, त्यामुळे मजुरांनी जगायचे तरी कसे? अशी मजूरवर्गाची कैफियत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी सांगितले.
सुरवसे-पाटील म्हणाले की, महागाईचा आगडोंब उसळला आहे, उन्हाचा कडाका सहन होईना, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अशी अवस्था मजूर वर्गाची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी निवडणुकीच्या धामधुमीत गुंतले आहेत. गरिबांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. मागील दहा वर्षांपासून केंद्र आणि राज्यामध्ये भाजप सरकार आहे. कष्टकरी-मजुरांसाठी रोजगार का उपलब्ध करून दिला नाही, शेतमालाला भाव नाही, राज्यकर्ते फक्त एकमेकावर चिखलफेक करण्यात दंग झाले आहेत. या गरिबांना दोन वेळचे जेवण आणि घोटभर पाणीसुद्धा मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे.
 
रोजगार मिळत नसल्याने सामान्य कष्टकरी हतबल झाला आहे. आणखी १५ दिवसांनी शाळा सुरू होतील, मुला-बाळांना कपडे, दप्तर, पुस्तके कशी घ्यायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. दहावी, बारावीतील मुलांना पुढील शिक्षणासाठी पैसा कोठून उभा करायचा अशा चिंतेत ही मंडळी आहेत. राज्यकर्त्यांनी किमान मजुरांच्या मुलांसाठी विशेष योजनेद्वारे मदत करावी, अशी मागणी सुरवसे-पाटील यांनी केली आहे.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *