पुणे, ता. २: पुण्याची ओळख सांस्कृतिक राजधानी, पूर्वेचे ऑक्सफर्ड, आयटी हब, वाहन उद्योगाची नगरी, अशा अनेक नावांनी आहे. पण गेल्या सुमारे दीडशे ते पावणेदोनशे वर्षांपूर्वीपासून पुण्याच्या बांधकाम आणि वास्तुविशारद क्षेत्राने कशी वाटचाल केली, याचे मनोहारी दर्शन ‘रिकलेक्टिंग पुणेज इंजिनिअर्स अँड बिल्डर्स’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाच्या निमित्ताने पुणेकरांनी घेतले. दीडशे वर्षांपूर्वी उभारलेल्या आणि आजही नित्य वापरात असलेल्या काही वास्तूंची पुनर्भेट या निमित्ताने पुणेकरांना आणि अभ्यासकांना घडली.

निमित्त होते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पुणे लोकल सेंटरच्या सहकार्याने आयोजित वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन आणि मुक्त संवादाचे. पुण्याचे वैभव असणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात हे प्रदर्शन झाले. वास्तुविशारदतज्ञ डॉ. सारा मेल्सेन यांना नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च, फ्रान्सकडून मिळालेल्या अभ्यासवृत्तीचा एक भाग म्हणून या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात डॉ. सारा यांनी परिश्रमपूर्वक मिळवलेली अस्सल आणि अधिकृत छायाचित्रे, त्यातील वास्तू, व्यक्ती आणि तत्कालीन साधनसामग्रीचे तपशील, डॉ. सारा यांनी स्वतः केलेले स्पष्टीकरण, यामुळे सुमारे दीडशे वर्षांच्या कालखंडातील पुण्यातील अनेक वारसास्थळे आणि वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंचा एक स्मरणरम्य प्रवास पुणेकरांसमोर उलगडला.
रावबहादूर गणपत केंजळे (१८४४ ते १९२०), विष्णुपंत रानडे, गणेश आपटे, नारायणराव कानेटकर, वसंत भाटे, बी. जी. शिर्के अशा अनेक बुजुर्ग वास्तूविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांनी तत्कालीन पुण्यात तसेच इतरत्र उभारलेल्या वैभवशाली वास्तू छायाचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर आल्या. ‘बीएआय’चे अध्यक्ष सुनील मते, उपाध्यक्ष अजय गुजर, सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदारपाटील, संशोधक रिचा शहा यांच्यासह संस्थेचे माजी अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.


 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                