ऋणानुबंध जपत मंतरलेल्या आठवणींना उजाळा

ऋणानुबंध जपत मंतरलेल्या आठवणींना उजाळा

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा ३५ वा मेळावा उत्साहात

पुणे : वसतिगृहातील जुन्या आठवणी… जडलेले परस्परांतील ऋणानुबंध… सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती… वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगत, समितीसाठी काही नवे संकल्प करत, एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेत मंतरलेल्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित ३५ व्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी नंदकिशोर गोतमारे, तर अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी सुधीर मोकाशे होते. गोखलेनगर जवळील लजपत भवनमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मंडळाचे अध्यक्ष गणेश बबन काळे आदी उपस्थित होते.

मेळाव्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते रमेश घोटिकर , कर्मचारी वसंत नगरकर, ताराबाई शिंदे यांना, तसेच देणगीदार भाऊसाहेब जाधव यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.  अरुण कोंडेजकर, ऍड. दौलत इंगवले, रत्नाकर मते व अरविंद औताडे पुरस्कृत आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार वितरित करण्यात आले. गायक मंगेश बोरगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

यंदाच्या मेळाव्याचे प्रायोजकत्व मराठवाडा विभागातील माजी विद्यार्थ्यांकडे होते. मंडळाचे उपाध्यक्ष अनिल खेतमाळीस, सचिव मनीषा गोसावी, खजिनदार ऍड. देविदास टिळे, मंडळाचे सदस्य जिभाऊ शेवाळे, दिनकर वैद्य, डॉ. अभय व्यवहारे, मनोज गायकवाड, शंकर बारवे, संभाजी सातपुते, राजू इंगळे, पुष्पा थोरात, अलकनंदा चौधरी- पाटील, संतोष घारे, संदीप इंगवले, समन्वयक बालाजी शिंदे, कार्यालयीन सहायक गणेश ननवरे तसेच ओंकार वाघमारे  यांनी मेळावा यशस्वी करण्यात परिश्रम घेतले.

सुधीर मोकाशे म्हणाले, “समितीने कामाची प्रेरणा आणि आत्मविश्वास दिला. विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे संस्कृतीतील विविधता अनुभवली. त्यातून मला माझा लेखन व साहित्य व्यवसाय अधिक व्यापक करण्यास मदत झाली.” नंदकिशोर गोतमारे म्हणाले, “समितीने माझे आयुष्य घडवले. जीवनमूल्यांची शिकवण दिली. समितीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी या कामात सक्रीय सहभाग घेऊन समितीचे हे काम पुढे न्यायला हवे.”

तुषार रंजनकर यांनी समितीच्या प्रकल्पांविषयी व आव्हानांविषयी सांगत नवीन वसतिगृहाच्या उभारणीसाठी निधी संकलनाचे आवाहन केले. ज्यांचा आपले आयुष्य घडविण्यात मोलाचा वाटा आहे अशा तांबोळी सरांचे खरे स्मारक करायचे असेल तर पुण्यात होणाऱ्या नवीन वसतिगृहातील एका हॉल साठी ५ कोटी निधी माजी विद्यार्थ्यानी संकलित करावा, असे आवाहन मनोज गायकवाड यांनी केले.

 मंडळाचे अध्यक्ष गणेश बबनराव काळे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. आजी व माजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी, तसेच माजी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी विभागीय स्तरावर संपर्क केंद्र उभारण्यासाठी मंडळ पुढील काळात काम करणार असल्याचे नमूद केले. अनिता सावंत-देशपांडे व लक्ष्मण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा गोसावी यांनी मंडळाच्या कार्यअहवालाचे, तर ऍड. देविदास टिळे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले. सुनील चोरे, निसार चौगुले यांनी समन्वयन केले. गणेश पाटीलबा काळे यांनी आभार मानले..

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *