दिलीप देशमुख यांचे मत; वंचित विकास संस्थेतर्फे अभया सन्मान सोहळा
पुणे : “अहिल्याबाई होळकरांनी राज्य राखले, राणी लक्ष्मीबाई स्वबळावर लढल्या. या सन्मानित महिला या आपल्या आयुष्यात अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाईचेच रूप आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये एक रणरागिणी दडलेली असतेच,” असे मत निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप देशमुख यांनी व्यक्त केले.
परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या तेजस्विनीना वंचित विकास संचालित अभया मैत्रिगटाच्या वतीने अभया सन्मानाने गौरविण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या स्वाती दुधाले, वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले, माया भांगे उपस्थित होते.
अर्चना धडे, दिपा पांडे, मनीषा पांढरे, सुनीता शहा, शोभा चितळे, वनमाला भिसे, प्रभा शिवणेकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात लढवय्या वृत्तीने परिस्थितीशी सामना करत उद्योजकता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
दिलीप देशमुख म्हणाले, “पुणे संकल्पनांचे शहर आहे. इथे नवनवीन संकल्पना घेऊन लोक पुढे येतात आणि त्या तडीस नेतात. अशा लढवय्या महिलांवर पुस्तक काढायला हवे. प्रत्येक महिलेचा प्रवास प्रेरणादायी आहे. वंचित विकास संस्थेचा हा उपक्रम महिलांना सन्मानाने जगण्याची दिशा दाखवणारा आहे.”
स्वाती दुधाले म्हणाल्या, “पुणे आणि परिसरातील महिलांसाठी उद्योजिका प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे. महिला सक्षमीकरणात ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे महत्वाचे असते. महिलांनी आर्थिक व्यवस्थापन व खंबीर मानसिकतेच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.”
पुरस्काराला उत्तर देताना शोभा चितळे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासारख्या पीडित बंधू-भगिनींना समर्पित करते. समाजमनात प्रबोधन करण्याची खूप गरज आहे.” देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.