बार्शी/पुणे : “आयुष्यात यश मिळवण्यासाठी असंख्य क्षेत्रे उपलब्ध आहेत. प्रत्येकाने स्वतःची क्षमता व गुणवत्ता ओळखून योग्य क्षेत्र निवडल्यास यश मिळवता येते. एखादी व्यक्ती मोठ्या उंचीवर पोहोचल्यावर समाज तिचे कौतुक करतो; मात्र त्या यशामागील कष्ट व परिश्रमांकडेही लक्ष दिले पाहिजे. अतिशय कष्टातून पुढे येत रमेश घोलप सनदी अधिकारी झाले व स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांचा संघर्ष आणि व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.
आयएएस अधिकारी रमेश घोलप यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘इथे थांबणे नाही’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन, तसेच उमेद प्रतिष्ठान निर्मित ‘वाट रेखाटणारी पावलं’ या मराठी, तर ‘ग्राऊंडेड ग्लोरी’ या इंग्रजीजीतील कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन नागराज मंजुळे व उद्योजक हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. बार्शी येथील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बी. वाय. यादव होते. प्रसंगी आमदार दिलीप सोपल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, माय मिरर पब्लिकेशनचे मनोज अंबिके, ज्येष्ठ नेते प्रा. तानाजी ठोंबरे, डिजिटल मीडिया संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने, रमेश घोलप यांच्या मातोश्री विमल घोलप, पत्नी रूपाली घोलप आदी उपस्थित होते.हणमंतराव गायकवाड म्हणाले, “करिअर निवडताना उद्योग क्षेत्राकडे सकारात्मकतेने पाहावे आणि वैयक्तिक यशाबरोबर समाजासाठी परत काहीतरी देण्याची जाणीव जपावी. रमेश घोलप यांनी संघर्षाच्या काळातील परिस्थितीची जाण ठेवत झारखंडमध्ये संवेदनशीलतेने केलेले काम मनाला भावले.” गायकवाड यांनी वैयक्तिक आयुष्यातील संघर्षातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग समूहाची ओळख निर्माण झाल्याची कहाणी सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
रमेश घोलप म्हणाले, “ज्या परिसरात शिक्षण घेतले, त्याच ठिकाणी हा प्रकाशन सोहळा होतोय, हा आनंदाचा क्षण आहे. संघर्षाच्या काळात शिक्षक, मित्र, कुटुंबीय आणि नागरिकांनी साथ दिली. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणे ही मोठी कमाई आहे. भविष्यातही आपल्या मातीचे नाव उंचावण्यासाठी कार्यरत राहीन.”
दिलीप सोपल यांनी आपल्या भाषणात रमेश घोलप यांच्या स्वर्गीय वडिलांसोबत असलेल्या मैत्रीच्या संबंधांचा भावनिक उल्लेख केला. बार्शीचा लेक झारखंडमध्ये जाऊन सर्वसामान्यांचा अधिकारी होतो, याचा अभिमान आहे. आपल्या मातीतल्या लेकराचे कौतुक आपण केले पाहिजे, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
डॉ. बी. वाय. यादव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवी रामचंद्र इकारे यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप, मार्गदर्शक तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, पी. टी. पाटील, नंदनजी जगदाळे, शिवदास नलावडे, प्राचार्य दीपक गुंड आदींनी परिश्रम घेतले.
