रक्तदानातून निर्माण होते रक्ताचे सर्वश्रेष्ठ नाते

रक्तदानातून निर्माण होते रक्ताचे सर्वश्रेष्ठ नाते

राम बांगड यांचे प्रतिपादन; रक्तदाता दिवसानिमित्त सुर्यदत्ता जीवनदाता पुरस्कार प्रदान

पुणे : “रक्तदानाविषयी समाजात आजही प्रबोधनाची गरज आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्यातून निर्माण होणारे रक्ताचे नाते अतूट आहे. याच रक्ताच्या अतूट नात्यामुळे आज ६५ वर्षांतही प्रचंड क्षमतेने कार्यरत आहे. संपूर्ण कोरोना काळात हजारो लोकांना रक्त आणि प्लाझ्मा पुरविण्याचे काम करू शकलो आणि हजारोंचे जीवन देऊ शकलो,” अशी भावना रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राम बांगड यांनी व्यक्त केली.

जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसंगी विक्रमी १४७ वेळा रक्तदान केलेल्या राम बांगड यांना ‘सुर्यदत्ता जीवनदाता पुरस्कार-२०२१’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतिक्षा वाबळे, सौ. बांगड, प्रा. सुनिल धाडीवाल यांच्यासह प्राध्यापक वर्ग  व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

राम बांगड म्हणाले, “रक्ताचे नाते संस्थेच्या माध्यमातून रक्त पुरवठा करण्यासाठी सहकाऱ्यांसह अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत. या कामात आपलेही सहकार्य हवे आहे. रक्तदानामुळे माणसाचा जीव वाचू शकतो, हे आपल्याला माहित आहे. याशिवाय, प्रगत तंत्रज्ञानामुळे रक्तातल्या वेगवेगळ्या घटकांचाही उपचारांसाठी वापर करणे शक्य होत आहे. प्लाझ्माचा उपयोग आपण कोरोना काळात झाल्याचे पाहिले आहे.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “बांगड यांच्यासारखे व्यक्तिमत्त्वे साक्षात माणुसकीचे प्रतिबिंब असतात. त्यांचे कार्य अवर्णनीय असते. त्यांचा सन्मान करताना मनस्वी आनंद होत आहे. त्यांच्या हातून मानवतेची सेवा अखंड घडत राहो. त्यांच्या या चळवळीत सूर्यदत्ता परिवार कायमच सोबत आहे.”

योगशिक्षिका सोनाली ससार यांनी रक्तदान व आरोग्य यावर उपस्थितांशी संवाद साधून त्यांच्यासोबत प्रात्यक्षिके सादर करत त्याचे महत्व पटवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *