राज्यसभा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन; वैद्य खडीवाले संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण

राज्यसभा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन; वैद्य खडीवाले संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण

पारंपरिक ज्ञानशाखांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न व्हावेत
राज्यसभा प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन; वैद्य खडीवाले संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण
वैद्य प्रशांत बागेवाडीकर यांना ‘महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार’ प्रदान
 
पुणे : “आपल्या पारंपरिक ज्ञानशाखांच्या पुनरुज्जीवनासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पुढाकार घेऊन जागतिक पातळीवर त्याचे मार्केटिंग केले पाहिजे”, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारकडून आयुर्वेदाला लोकाभिमुख करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी झाले. एरंडवण्यातील धन्वंतरी सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सोलापूर येथील वैद्य प्रशांत बागेवाडीकर यांना ‘महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वैद्य विनायक प. खडीवाले, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष वैद्य स. प्र. सरदेशमुख, सचिव वैद्य योगेश व. गोडबोले, विश्वस्त वैद्य संगीता खडीवाले, विश्वस्त वैद्य निखिल खडीवाले, विश्वस्त वैद्य विवेक साने, विश्वस्त जयश्री टाव्हरे आदी उपस्थित होते.
 
समारंभात वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार पुण्यातील वैद्य गुणवंत येवला, वैद्य द. वा. शेंडे रसौषधी पुरस्कार पुण्यातील वैद्या विशाखा बाक्रे, वैद्य वि. म. गोगटे वनौषधी पुरस्कार नाशिकच्या वैद्य अर्चना भास्करवार, वैद्य आचार्य यादवजी त्रिकमजी ग्रंथ पुरस्कार सांगलीतील वैद्य अनिरुध्द कुलकर्णी व वैद्य अमृता जोशी, वैद्य बाळशास्त्री लावगनकर पंचकर्म पुरस्कार नागपूरच्या वैद्य सचिन चंडालिया, वैद्य बापूराव पटवर्धन सुश्रुत पुरस्कार वर्ध्यातील वैद्य शीतल आसुटकर, वैद्य भा. गो. घाणेकर अध्यापन पुरस्कार गोव्यातील वैद्या अरुणा बाले, वैद्य मा. वा. कोल्हटकर संशोधन पुरस्कार मुंबईतील वैद्या कल्पना धुरी, वैद्या लक्ष्मीबाई बोरवणकर स्त्री वैद्या पुरस्कार पुण्यातील वैद्या हेमलता जळगावकर, वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे कार्यकर्ता पुरस्कार पुण्यातील वैद्य मनिष जोशी, पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार पुण्यातील वैद्य जय ताम्हाणे व डॉ. वा. द.वर्तक वनमित्र पुरस्कार रघुनाथ ढोले यांना प्रदान करण्यात आला. २१ हजार रोख रक्कम व मानपत्र देऊन या वैद्यांना सन्मानित करण्यात आले.
 
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “आयुर्वेदाला आता चांगले दिवस आले आहेत. इतकी वर्षे आपल्या पारंपरिक ज्ञानशाखांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे प्राचीन संशोधन, प्रयोग जे अनुभवांतून सिद्ध झाले होते, तेही मागे पडले. त्यांना वाव मिळाला नाही. आता मात्र परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे आयुर्वेद तज्ञांनी अन्य पॅथींसह कुठे सहकार्य करणे शक्य आहे, याचा विचार करावा. परस्परांसह चर्चा, संवाद साधावा. ज्याद्वारे पारंपरिक ज्ञानशाखांचे आधुनिक काळातील पुनरुज्जीवन शक्य होईल.”
 
वैद्य प्रशांत बागेवाडीकर म्हणाले, “आज आयुर्वेदाला कधी नव्हता इतका अनुकूल काळ दिसत आहे. आयुर्वेदासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी अतोनात संघर्ष आणि परिश्रम घेतले आहेत. त्यांचे ऋण मान्य केले पाहिजे. आयुर्वेदिक रसशास्त्रातील औषधे वापरू नका, हा अपप्रचार थांबवला पाहिजे. आपल्या ज्ञानाचा प्रसार, प्रचार करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यातूनच आयुर्वेद जागतिक स्तरावर जाईल.”

प्रास्ताविकात वैद्य विनायक खडीवाले म्हणाले, “पुरस्काराचे हे ४० वे वर्ष आहे. आयुर्वेद क्षेत्रात जे समाजासाठी चांगले, सकारात्मक कार्य करीत आहेत, त्यांचे कौतुक, त्यांच्या कार्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या कार्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, या हेतूने वैद्य दादा खडीवाले यांनी याची सुरुवात केली.”

 
पुरस्कारप्राप्त सर्व वैद्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीकृष्ण चितळे यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. वैद्य संगीता खडीवाले यांनी सूत्रसंचालन केले.‌ वैद्य विवेक साने यांनी आभार मानले.
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *