पिंपरी, दि. २७- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रबोधन पर्वाचा उत्साहात समारोप काल झाला. दोन दिवसीय या प्रबोधन पर्वामध्ये विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना नागरिकांचा देखील भरघोस प्रतिसाद लाभला.
प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात सकाळी १० वाजता के. एस. बी. चौक, पिंपरी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाजवळ ढोल-ताशा वादनाच्या जुगलबंदीने झाली. येथे ढोल ताशांच्या गजरात मनमोहक सादरीकरण करत राजर्षी शाहू महाराजांना निनादमय अभिवादन करण्यात आले.
सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजी नगर, चिंचवड येथील साई मंदिर उद्यानात सुप्रसिद्ध शाहीर प्रकाश ढवळे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान सादर केले. यावेळी त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण प्रसार आणि बहुजनहिताय घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयांचे प्रभावी वर्णन करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील, विजय नाळे, मिलिंद वेल्हाळ, जगदीश परिट, सुनिल पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
यानंतर, सायंकाळी ७ वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विविध लोककलांचा समावेश असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जयेंदू मातोश्री प्रोडक्शनतर्फे सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात २५ हून अधिक कलाकारांनी ग्रामीण महाराष्ट्राची लोकसंपदा, पारंपरिक गीत-नृत्य आणि सांस्कृतिक वैभव याचे दर्शन घडवत विविध लोकगीतांची रंगतदार मैफल सादर केली.