भारतीय नऊ शास्त्रीय नृत्य कलांचे सादरीकरण; डॉ. ममता मिश्रा यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे, दि. ८ – मासिक पाळीच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी कलिंग कला केंद्र ट्रस्टतर्फे ओडिशाच्या पारंपरिक ‘रज महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन (Kalinga Kala Kendra Trust organizes Odisha’s traditional ‘Raj Mahotsav 2025’ event ) केले आहे. रविवार, दि. १५ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे आयोजित या रज महोत्सवात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडणार असून, विविध प्रकारच्या नऊ शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. ममता मिश्रा (Founder President of the Trust Dr. Mamta Mishra ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी हिरकणी सोशल फाउंडेशनच्या सीईओ पूर्णिमा लुनावत, ट्रस्टच्या सचिव निक्षिता सारंगी, सहसचिव पौलमी चॅटर्जी व खजिनदार लोकनाथ सारंगी उपस्थित होते.
डॉ. ममता मिश्रा म्हणाल्या, “महोत्सवात प्रसिद्ध ओडिशी ‘बनस्ते डाकीला गजा, बरसके थरे आसीची रज’ या नृत्य-गायनातून रजस्वलाची भावना व्यक्त होईल. यामध्ये स्वागतिका महापात्रा, रश्मीता प्रसाद, स्मिता दास, अरुणिमा मोहंती यांच्यासह ओडिशी नृत्यांगना मधुमिता मिश्रा यांच्या शिष्य सादरीकरण करणार आहेत. नृत्य नवरत्न या कार्यक्रमातील आकर्षण असून, यामध्ये पुजायिता भट्टाचार्य (ओडिशाचे ओडिशी), पौलोमी साखळकर (पश्चिम बंगालचे गौडीयो), सुजा दिनकर (केरळचे मोहिनीअट्टम), धनिया मेनन (आंध्रप्रदेशचे कुचिपुडी), मौसमी रॉय-देव (उत्तरप्रदेशचे कथक), पारोमिता मुखर्जी (केरळचे कथकली), सुमना चॅटर्जी (मणिपूरचे मणिपुरी), योषा रॉय (आसामचे सात्रीया), प्रिया भट्टाचार्य (तामिळनाडूचे भरतनाट्यम) नृत्यप्रकार सादर करणार आहेत. ‘रंगबती’ गाण्यावर ओडिशाचे प्रसिद्ध लोकनृत्य सादर होणार आहे. सर्व महिला कलाकारांना ‘रज क्वीन’चा क्राऊन देऊन सन्मानित केले जाणार आहे.”
“ट्रस्टतर्फे गेल्या १५ वर्षांपासून ‘एक विचार, अनेक राज्ये’ या कल्पनेवर आधारित भारतीय शास्त्रीय नृत्य, संगीत, कला व संस्कृतीचे शिक्षण देण्यासह त्याचा प्रचार करत आहे. ओडिशामध्ये रज महोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. आसाममध्ये कामाख्या मातेसाठी होणारा अंबुबाची महोत्सव, महाराष्ट्रात होणार ऋतुमती उत्सव, ज्यातून स्त्री जीवनाचे चक्र आणि प्रजननाच्या भारतीय सांस्कृतिक श्रद्धेला प्रोत्साहन देतात. हा रज महोत्सव मासिक पाळी स्वच्छता आणि जागरूकता यांना संस्कृतीशी जोडतो. रज हा मूळ शब्द ‘रजस्वला’ आहे. हा चार दिवसांचा उत्सव असून, ओडिशात प्राचीन काळापासून साजरा केला जातो. हा आई पृथ्वीच्या मासिक पाळी आणि मातृत्वाच्या तयारीचे प्रतीक आहे. हा उत्सव पावसाळ्यातील पहिल्या पावसाबरोबर साजरा केला जातो. त्यातून धरती शेतीसाठी सुपीक बनते. यामध्ये पहिल्या दिवशी पहिली रज (रजस्वला), दुसऱ्या दिवशी मिथुन संक्राती, तिसऱ्या दिवशी शेषा रज, तर चौथ्या दिवशी हळदीचे पाणी व फुलांचे वसुमती स्नान असते. या चार दिवसांत मुलींना राणीसमान मान असतो. पारंपरिक पोशाख, झुला, गोडधोड पदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात,” असेही डॉ. ममता मिश्रा यांनी नमूद केले.