पुणे, दि. २० – रामायणातील राम जन्मापासून ते रावणवध करून अयोध्येला परत आल्यावर झालेला राज्याभिषेक इथपर्यंत विविध प्रसंगावर आधारित रचलेल्या बंदिशींचे सादरीकरण आणि त्याच बंदिशींवर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन असा अनोखा कलाविष्कार ‘रामगान : दृक-श्राव्य’ कार्यक्रमातून पुणेकर रसिक, श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. पंधरा बंदिशींतून, चित्रांतून ‘रामगान’ (Ramgaan) रामायणातील अंतरंग उलगडणार आहे.
भाग्यश्री गोडबोले म्हणाल्या, “रामायणातील अनेक प्रसंग, प्रभू रामचंद्रांची महती, विविध पैलूंवर प्रकाश टाकत स्वरबद्ध बंदिशी ‘रामगान’ कार्यक्रमातून सादर होणार आहेत. कथा, गीत आणि चित्रांच्या माध्यमातून हा कार्यक्रम भक्ती, कलात्मकता आणि सौंदर्य यांचा संगम घडवणार आहे. याच बंदिशींमधील भाव चित्रांतून पाहता येणार आहेत. त्यामुळे पुणेकर रसिकांना कान तृप्त करण्याची आणि डोळ्याचे पारणे फिटेल, असा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.”
कार्यक्रमात भाग्यश्री गोडबोले यांच्यासह पंडित अमोल निसळ, डॉ. सानिका गोरेगावकर, सावनी दातार, श्वेता कुलकर्णी यांचे गायन असणार आहे. डॉ. सुनील देवधर यांचे आशयपूर्ण निवेदन, तर तबल्यावर अमित जोशी, संवादिनीवर शुभदा आठवले, व्हायोलिनवर अंजली सिंगडे-राव यांची साथसंगत लाभणार आहे. ही आगळीवेगळी दृक-श्राव्य मैफल सर्वांसाठी विनामूल्य खुली असणार आहे.