जपानचे निसर्ग सौंदर्य, संस्कृती पाहून हरखले पुणेकर

जपानचे निसर्ग सौंदर्य, संस्कृती पाहून हरखले पुणेकर

जपानचे निसर्ग सौंदर्य, संस्कृती पाहून हरखले पुणेकर

‘लँडस्केप अँड लिजंड्स’ तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन; रविवारपर्यंत विनामूल्य खुले राहणार

जागतिक पर्यटन दिनानिमित्त गेट सेट गो हॉलीडेजतर्फे आयोजन; छायाचित्रे, पेंटिंग्जचा मनोहारी संगम

पुणे: जपानमधील (Japan) अद्भुत निसर्गरम्य स्थळांची व तेथील वन्यजीवांची छायाचित्रे, कुंचल्यातून साकारलेले निसर्गसौंदर्य, छोट्या पारंपरिक बाहुल्या, हस्तकलेतून प्रतिबिंबित केलेली जपानी संस्कृती पाहून पुणेकर हरखुन गेले. निमित्त होते, जागतिक पर्यटन दिनानिमित्त गेट सेट गो हॉलीडेजच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘लँडस्केप अँड लिजेंड्स: ए जपानी कल्चर मोझॅक’ या प्रदर्शनाचे!

जपानी कला (art), संस्कृती (culture) आणि कारागिरीचा त्रिवेणी संगम असलेले हे प्रदर्शन कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण कला दालनात भरले आहे. येत्या रविवारपर्यंत (ता. २९) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे. छायाचित्रकार किरण जोशी यांनी काढलेली छायाचित्रे आणि चित्रकार आसावरी अरगडे यांनी रेखाटलेली चित्रे मन मोहून टाकत आहेत. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका शमा पवार यांच्या हस्ते झाले. प्रसंगी संचालनालयाच्या मौसमी खोसे, हिताची अस्तिमो कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जुनरो उत्सुमी सान, संचालक सुधीर गोगटे, संयोजक व ‘गेट सेट गो’चे संचालक अमित कुलकर्णी, अस्मी कुलकर्णी, गायिका मनीषा निश्चल आदी उपस्थित होते.

शमा पवार म्हणाल्या, “जपान आणि भारत यांच्यातील नाते खूप प्राचीन आहे. प्राचीन संस्कृती, निसर्गसौंदर्य याचे दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनात डोळ्यांचे पारणे फिटले असून, प्रत्यक्ष जपान फिरतो आहोत, असा अनुभव येतो. इतके सुंदर ठिकाण पाहण्यास आपणही जावे, अशी भावना मनात येते. महाराष्ट्र आणि भारताची पर्यटन स्थळे जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न सुरु आहेत. इनक्रीडेबल इंडिया आणि महाराष्ट्र अनलिमिटेड या उपक्रमातून पर्यटनाला चालना देण्यावर भर दिला जात आहे.”

जुनरो उत्सुमी सान यांनी भारतीयांचे जपानला कायमच प्रेम मिळाले असून, पर्यटन व व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध अधिक घट्ट होत असल्याचे नमूद केले. अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात जपान वेगळ्या नजरेतून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो. लवकरच दिव्यांगांसाठी एक जपानची सहल आयोजित करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.

जपानमधील निसर्गसंपन्न लँडस्केप फोटोग्राफी, वाइल्डलाईफ फोटोग्राफी, पर्यटनस्थळांचे वॉटर कलरमधील कॅनव्हास पेंटिंग्ज, प्रसिद्ध ओरिगामी आणि त्याची प्रात्यक्षिके, तेथील आकर्षक वस्तू, जगप्रसिद्ध सुंदर बाहुल्या, जपानी कला, संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

मौसमी खोसे, सुधीर गोगटे यांनीही मनोगते व्यक्त केली. ओंकार दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. अस्मि कुलकर्णी यांनी आभार मानले. किरण जोशी आणि आसावरी अरगडे यांचा विशेष सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. अनेक पर्यटन प्रेमींनी उपस्थिती लावत प्रदर्शनचा आनंद घेतला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *