पुणे विद्यार्थी गृहाच्या ११६ व्या वर्धापनदिनी
कुलगुरू दादासाहेब केतकर यांना अभिवादन
पुणे, दि. 15- गरीब व होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा ११६ वा वर्धापनदिन (Pune Vidyarthi Griha celebrates its 116th anniversary with enthusiasm ) उत्साहात साजरा झाला. संस्थेचे संस्थापक कुलगुरू दादासाहेब केतकर, डॉ. अण्णासाहेब खैर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम मंदिरात सकाळी संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांच्या हस्ते शास्त्रोक्त पूजा, अभिषेक व महाआरती, तर दुपारी वेदघोष करण्यात आला. सायंकाळी माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतकांसाठी मेळाव्याचेही आयोजन केले होते.
पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ माजी विद्यार्थी शिक्षणतज्ज्ञ श्रीधर पाटणकर, सदस्या पौर्णिमा लिखिते, संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे व अमोल जोशी, कार्यवाह संजय गुंजाळ, कोषाध्यक्ष कृष्णाजी कुलकर्णी, कुलसचिव दिनेश मिसाळ, संचालक मंडळातील सदस्य आनंद कुलकर्णी, सुनील रेडेकर, राजेंद्र कडुस्कर, रमेश कुलकर्णी, डॉ. राजेंद्र कांबळे यांच्यासह सल्लागार व कार्यकारी मंडळाचे सदस्य, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
पुण्यातील नामांकित कायदेतज्ज्ञ ऍड. श्रीकांत कानेटकर, माजी विद्यार्थी न्यायाधीश श्रीपाद देशपांडे, संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. सतीश देसाई यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी, देणगीदार यांनी संस्थेला वर्धापनदिनाच्या निमित्ताने देणगी देऊन उपकृत केले. हा सोहळा पुणे विद्यार्थी गृहाच्या सदाशिव पेठेतील मुख्यालयात झाला. वर्धापनदिनाच्या निमित्ताने ११ व १२ मे या दोन दिवशी संस्थेत आयोजित निवासी संमेलनात राज्यभरातील ९५ वर्षे वयापर्यंतचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.