डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांना लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये अवॉर्ड
पुणे : भारतातातील सुपरकपॅसिटरचे जनक, शास्त्रज्ञ व स्पेल टेक्नॉलॉजीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांना वेस्टमिनिस्टर लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (ब्रिटिश पार्लमेंट) ‘अचिव्हर्स वर्ल्ड लीडरशिप अवॉर्ड-२०२३’ प्रदान करण्यात आला. प्रगत ऊर्जा साठवण यंत्र (ऍडव्हान्स एनर्जी स्टोरेज डिव्हाईस) निर्मितीसाठी डॉ. राजेंद्रकुमार शर्मा यांना हा पुरस्कार देण्यात आला असून, सुपर कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी स्पेल टेक्नॉलॉजी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. सी-मेट लिथियम-आयन बॅटरीचे आणि सोडियम आयन टेक्नॉलॉजीचे ते प्रवर्तक आहेत.
अचिव्हर्स वर्ल्ड मॅगझीन, इंडियन अचिव्हर्स फोरम आणि ग्लोबल इंडियन ऑर्गनायझेशन-युके यांच्या संयुक्त विद्यमाने युरेशियन बिझनेस समिट व अचिव्हर्स वर्ल्ड लीडरशिप अवॉर्डचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘युके’चे सर्वात ज्येष्ठ खासदार वीरेंद्र शर्मा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी केरळच्या कोट्टायमचे खासदार थॉमस चाझीकडन, युगांडाचे युके व आयर्लंडमधील उच्चायुक्त निमिषा माधवा, ‘युके’तील आयसीआयसीआय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोकनाथ मिश्रा, ग्लोबल इंडियन ऑर्गनायझेशन युकेचे उपाध्यक्ष महेंद्रसिंह जडेजा, अचिव्हर्स वर्ल्डचे संपादक हरीश चंद्र आदी उपस्थित होते.
जागतिक स्तरावरील या कार्यक्रमामध्ये १०० पेक्षा अधिक विविध देशांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. जागतिक व्यापार, व्यावसायिक संबंध, इनोव्हेशन्स याविषयी चर्चा या व्यासपीठावर करण्यात आली. वीरेंद्र शर्मा यांनी जागतिक स्तरावरील द्विपक्षीय संबंधांच्या महत्त्वावर जोर देत भारत आणि यूके यांच्यातील व्यापार, व्यावसायिक सहकार्य वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. थॉमस चाझीकडन यांनी भारताच्या बहुआयामी विकासाचे कौतुक केले. जगभरातील भारतीयांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकत पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
स्पेल टेक्नॉलॉजीजच्या संचालक संगीता शर्मा यांनी जागतिक स्तरावरील ‘अचिव्हर्स वर्ल्ड लीडरशिप अवॉर्ड २०२३’ पुरस्कार मिळाल्याचा आनंद वाटत आहे. भारताची मान अभिमानाने उंचावण्यात योगदान देता येत असल्याचा अभिमान वाटतो.
“भारतीय बनावटीच्या ऊर्जा साठवणूक उपकरणांची निर्मिती आम्ही करत आहोत. लिथियम-आयऑन बॅटरीच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालय आणि स्पेल टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी उभारले आहे. बॅटरी निर्मितीसाठी छोट्या उद्योगांना सहकार्य केले जाते. आत्मनिर्भर भारताकडे टाकलेले हे एक पाऊल आहे.”
– डॉ. राजेंद्रकुमार शर्मा, शास्त्रज्ञ व मुख्य व्यवस्थापकीय संचालक, स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड.