आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद अथर्व शर्मा, माध्वीन कामत जोडीने पटकविले

आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद अथर्व शर्मा, माध्वीन कामत जोडीने पटकविले

पुणे: इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या वतीने कोलकाता येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या अथर्व शर्मा (पुणे) व माध्वीन कामत (गुजरात) या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत एकमेकांच्या साथीने प्रथमच खेळणाऱ्या अथर्व व माध्वीनने चमकदार कामगिरी करत भारताच्याच कबीर हंस व मान केसरवानी या जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव केला.
 
एक तासाहून अधिक वेळ चाललेल्या या सामन्यात दोन्ही सेटमध्ये अथर्व व माध्वीन जोडीने वर्चस्व कायम राखले. सुरुवातीपासूनच दोघांनीही उत्तम सर्व्हिस आणि आक्रमक खेळ करत गुणांमध्ये आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत संपूर्ण स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी कायम ठेवली. या विजेतेपदानंतर अथर्वने जागतिक क्रमवारीत ५९० वरून ५०० व्या स्थानी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुष गटात अथर्वने याआधीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद व उपविजेतेपद पटकविले आहे.
 
अथर्व शर्मा म्हणाला, “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा आनंद वाटतो. माझे आणि माध्वीनचे एकत्र खेळणे हे पहिल्यांदाच होते. त्याच्यासोबत खेळताना खूप मजा आली. या प्रवासात आम्हाला कुटुंबीय, प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन व मोलाची साथ लाभली.”