लोकप्रतिनिधींनी पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करावा

लोकप्रतिनिधींनी पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करावा

प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन; आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने विधान परिषदेचे सभापती झाल्याबद्दल शिंदे यांचा नागरी सत्कार

पुणे: “आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल, हिताचे निर्णय होतील, या आशेने सामान्य नागरिक विधिमंडळाकडे पाहत असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी करायला हवा,” असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. हा घरचा, गावकऱ्यांनी केलेला सत्कार भावस्पर्शी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल प्रा. राम शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. विधान परिषद आमदार योगेशअण्णा टिळेकर यांच्या पुढाकारातून कोंढवा बु. ग्रामस्थ, कर्जत-जामखेड, करमाळा रहिवाशी संघाच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. इस्कॉन मंदिर सभागृहात आयोजित सोहळ्यात योगेशअण्णा टिळेकर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, वृषाली कामठे, नगरसेवक अनिल येवले, सतीश मरकड, तुषार कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, इस्कॉन मंदिराचे संजय भोसले, स्थानिक पदाधिकारी विरशेन जगताप आदी उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, “निवडणुकीत पराभूत होऊनही पक्षाने या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी दिली. हा मोठा बहुमान आहे. सभागृह चालवताना लोकांचे प्रश्न मांडत असलेल्या सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. माझ्यासह योगेश टिळेकर हेही विधानसभेला पराभूत झाले, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस व पक्ष नेतृत्वाने आम्हाला जनतेसाठी काम करण्याची संधी दिली. मनात स्वच्छ, निर्मळ आणि लोकांप्रती संवेदना जागृत असतील, तर न्याय मिळतोच.”

“आम्हाला दोघांनाही कट कारस्थान करून पराभूत केले. मात्र मागे न सरकण्याची आमची भूमिका आहे. लोकांमध्ये राहणारा माणूस असल्याने पक्षाने आमचा सन्मान ठेवला. योगेश टिळेकर यांनी सभागृहात पोटतिडकीने आपल्या भागातील, तसेच राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न, लक्षवेधी मांडल्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच दालनात बैठका लावल्या असून, १५ ते २० दिवसात समान पाणीपुरवठा आणि कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न सुटेल. माथाडी कामगारांवर अन्याय होणार नाही. विधेयकात काही तरतुदी बदलाव्या लागल्या, तर चर्चा करून त्यात सुधारणा केली जाईल.”

योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, सामान्य कुटुंबातील आपला माणूस विधान परिषदेचा सभापती झाला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांची सेवा करताना तुमचे प्रश्न जोरकसपणे मांडू शकतो, कारण तिथे शिंदे साहेब आता सभापती म्हणून बसले आहेत. त्यांच्या कार्यातून नेहमीच शिकत आलो आहे. अहमदनगरचे अहिल्यानगर होण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. राजमाता अहिल्याबाई यांचा आदर्श घेऊन शिंदे साहेब काम करत आहेत. चोंडीचा विकास करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. शिंदे, होळकर परिवाराचा वारसा यशस्वीपणे चालवत आहेत. संघटनेने, नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकला. आप्तस्वकीयांचा हा सत्कार आपल्याला ऊर्जा देणारा ठरेल. देवेंद्र फडणवीस आणि प्रा. राम शिंदे यांची जोडी महाराष्ट्राला दिशा देईल. आपल्या पाठिंब्याने कात्रज, कोंढवा भागातील प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास वाटतो.”

संजय भोसले, भूषण नहाटा यांनी मनोगते व्यक्त केली. गोकुळ बरकडे यांनी प्रास्ताविक केले. अमर हजारे यांनी सूत्रसंचालन केले. वीरशेन जगताप यांनी आभार मानले. मानपत्र वाचन अश्विनी कामठे यांनी केले.

 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *