अधिकाऱ्यांनी शेती व जनतेच्या कल्याणकारी कामाला प्राधान्य द्यावे
डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे मत; मनोविकास प्रकाशनातर्फे अविनाश सुभेदार यांच्या ‘सुभेदारी’ आत्मकथनाचे प्रकाशन
पुणे: “चांगला माणूसच एक चांगला अधिकारी बनू शकतो. माणुसकीचा ओलावा, परिस्थितीची जाणीव, सामान्यांची कणव आणि त्याच्यातील चांगुलपणा लोकाभिमुख अधिकारी घडवतो. कृतज्ञतेच्या वृत्तीने समाजासाठी झटणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमुळेच राज्य चालतेय,” असे प्रतिपादन राज्याचे माजी माहिती आयुक्त व ज्येष्ठ साहित्यिक-संपादक विजय कुवळेकर यांनी केले.
माजी सनदी अधिकारी (आयएएस) अविनाश सुभेदार लिखित मनोविकास प्रकाशन प्रकाशित ‘सुभेदारी’ या आत्मकथन प्रकाशन सोहळ्यात विजय कुवळेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक होते. कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे झालेल्या सोहळ्यात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, लेखक अविनाश सुभेदार, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर, पुस्तकाचे शब्दांकन केलेले नितीश साळुंके आदी उपस्थित होते.
विजय कुवळेकर म्हणाले, “मातीतून येणारे शहाणपण माणसाला घडवते. गरिबीचे चटके सोसलेला माणूस सामन्यांच्या भावना अधिक तीव्रतेने समजून घेऊ शकतो. ग्रामीण भागात राहून मराठीतून शिक्षण घेऊनही उत्तम अधिकारी होता येते, याचे उदाहरण अविनाश सुभेदार आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ‘ॲक्टिंग’पेक्षा ‘ॲक्शन’वर भर दिल्यानेच त्यांच्या हातून चांगले काम होऊ शकले.”
डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, “कृषी महाविद्यालयाने ‘नेहमी खरे वागा’ ही शिकवण दिली. त्याला सुभेदार खरे उतरले आहेत. जनता ही मालक आहे. शासन व प्रशासन जनतेच्या सेवेचे काम करतात. शेती जगली, तरच आपण जगू शकतो. शेती नसेल, तर जगही नष्ट होईल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नेहमी शेती, शेतकरी व सामान्य जनतेच्या कल्याणाचे काम करण्याला प्राधान्य द्यावे.”
चंद्रकांत दळवी यांनी हे पुस्तक नव्या पिढीतील अधिकाऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले. अगदी सोप्या आणि सहज भाषेत कोणताही अभिनिवेश न बाळगता सुभेदारांनी आपला प्रवास उलगडला असल्याचे ते म्हणाले. गेल्या दोन दशकात सनदी अधिकाऱ्यांनी उत्तम साहित्य लिहिले आहे. सुभेदारांमधील अधिकाऱ्यापेक्षा संवेदनशील माणूस अधिक भावतो, असे शेखर गायकवाड यांनी नमूद केले.
अविनाश सुभेदार म्हणले, “जीवनात निष्ठेने व कर्तव्य भावनेने भूमिका बजावली. नेहमी सर्वोत्तम द्यायचे, याच ध्येयाने कार्यरत राहिलो. जांभूळपाड्याची दुर्घटना माझ्यातील माणूसपणाची कसोटी पाहणारी होती. मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांसोबतची चार वर्षे सर्वोत्तम राहिली. अनेकदा संघर्ष करावा लागला. मात्र प्रामाणिकपणा, चिकाटी न सोडता लोकांसाठी थोडेफार योगदान देऊ शकल्याचे समाधान आहे.”
प्रास्ताविकात अरविंद पाटकर म्हणाले, प्रशासकीय अधिकारी संवेदनशील, समाजाभिमुख कसे असावेत, याचे दर्शन सुभेदार यांच्या पुस्तकात दिसते. लोककल्याणासाठी काम करणार्या या अधिकार्याचे आत्मकथन प्रकाशित करताना समाधान वाटले.” डॉ. संजय उपाध्ये यांनीही सुभेदार यांच्या कार्याचे कौतुक केले. सुप्रिया गोडबोले-चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत गरगटे यांनी आभार मानले.