राष्ट्रवादी आध्यत्मिक व वारकरी आघाडीतर्फे घुमणार ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ नाद
पुणे: राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी, महाराष्ट्र राज्य संपूर्ण महाराष्ट्रभर भजन, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार करणार आहे. या प्रचार वारीची शनिवारी पुण्यातील पत्रकार भवन येथून झाली. हरिनामाचा गजर करीत, वारकर्यांनी सर्वधर्मसमभाव जपणार्या महाविकास आघाडीला निवडून देण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे प्रमुख हभप विठ्ठल (आबा) मोरे, राज्य उपाध्यक्ष हभप मुबारक शेख, संपर्कप्रमुख हभप सूरज महाराज लवटे यांच्यासह टाळ, मृदुंग, वीणा घेऊन शेकडो वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत.
या प्रचार वारीचा रथ पुण्यातून पुढे सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, नाशिक, खानदेश आणि विदर्भात जाणार आहे. या वारीचा मुख्य उद्देश हा मतदारांना पुरोगामी विचारधारेने प्रेरित करण्यासह तत्कालीन सरकारच्या चुका लक्षात आणून देऊन महविकास आघाडीचे महत्व पटवून देणे हा आहे, असे विठ्ठल (आबा) मोरे यांनी सांगितले.
विठ्ठल (आबा) मोरे पुढे बोलताना म्हणाले, “विद्यमान सरकार हे मनुवादी विचारांचे आहे. जाती, धर्मात भांडण लावण्याचा प्रयत्न सरकारमधील अनेक लोक करत आहेत. या धर्मांध, संविधान विरोधी सरकारच्या विरोधात आम्ही प्रचार करत आहोत. सर्वांना संतांच्या विचारांचे पालन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मतदान करण्याचे आवाहन या वारीच्या माध्यमातून करत आहोत. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावावा.”
“आध्यात्मिक व वारकरी आघाडीचा प्रचार वारीचा हा तिसरा टप्पा आहे. यापूर्वी दोन वेळा आम्ही महाराष्ट्र दौरा केला आहे. त्याचा देखील फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेमध्ये झाला होता. विधानसभा निवडणुकीत संत विचारांना मानणारे मतदार महा विकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतील,” हभप मुबारक शेख यांनी सांगितले.