पुणे : “केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग आणि खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून विणकर, हातमाग व्यावसायिकांसाठी अनेक योजना आणल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृतकालामध्ये स्वदेशी, तसेच ‘लोकल फॉर ग्लोबल’ योजनेमुळे देशभरातील छोट्या व्यावसायिकांना पाठबळ मिळाले आहे,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. देशभरातील विणकरांची कलाकुसर पाहण्याची, तसेच त्यांच्या कलेला दाद देण्याची संधी पुणेकरांना या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचालित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित ‘माय प्राईड, माय हॅन्डलूम’ या भव्य हातमाग प्रदर्शनाचे (बिगेस्ट हॅन्डलूम एक्झिबिशन) उद्घाटन प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक (नि.) श्रीनिवास राव, स्तंभलेखिका शेफाली वैद्य, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासह अन्य १५ राज्यांतील ६० पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे. हर्षल हॉल, करिश्मा सोसायटीजवळ, कर्वे रोड पुणे येथे ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.
श्रीनिवास राव म्हणाले, “देशभरातील विणकर कामगारांनी केलेली कलाकुसर एकत्रितपणे पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे पुण्यातील हे पाचवे प्रदर्शन आहे. कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे. रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते. ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत.”
पश्चिम बंगालच्या बुटीक साड्या, प्रिंटेड, चंदेरी, पैठणी, माहेश्वरी, बनारसी, गढवाल, कलमकरी, कांचीपुरम, करवथी अशा विविध राज्यांची ओळख असलेल्या असंख्य साड्या येथे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश अशा विविध भागांतून साड्या, ड्रेस मटेरियल व अन्य साहित्याचे स्टॉल लागले आहेत, असे राव यांनी नमूद केले.