अटल फाउंडेशनच्या वतीने नवी दिल्ली येथे शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यालाबद्दल
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘इंटरनॅशनल अटल अवॉर्ड २०२३’ प्रदान
पुणे : नवी दिल्ली येथील अटल फाउंडेशनच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘इंटरनॅशनल अटल अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयाच्या वतीने आयोजित तिसऱ्या अटल गौरव सन्मान व पहिल्या इंटरनॅशनल अटल अवॉर्डचे वितरण केंद्रीय आयुष मंत्रालय आणि महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ. महेंद्र मुंजापरा, भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष व अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांच्या हस्ते झाले. देशभरातून आलेल्या ३५ जणांना अटल गौरव सन्मान, तर विविध देशांतून आलेल्या १५ जागतिक स्तरावरील नामवंत व्यक्तींचा इंटरनॅशनल अटल अवॉर्ड प्रदान करण्यात आला. यामध्ये नेपाळमधील बाराचे खासदार कृष्णकुमार श्रेष्ठ यांना ‘राजनैतिक शांतता’, तर दक्षिण कोरियातील टोनी सपसॉन्ग यांचा समावेश आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्यासह ऍस्ट्रॉलॉजर राजेश ओझा, बंबालाल दिवाकर, द्वारकाधीश पीठाधीश्वर बगीश कुमार गोस्वामी, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, हरियाणा राज्य सहकारी बँकेचे चेअरमन ठाकूर हुकूम सिंग भाटी व देशातील मान्यवर व्यक्तिमत्वे या कार्यक्रमाला उपस्थित होते. अटलजींच्या आदर्शांवर कार्य उभारणाऱ्या व्यक्तींना अटल गौरव सन्मान देण्यात आला. यंदापासून देण्यात आलेल्या इंटरनॅशनल अटल अवॉर्ड विविध देशांतून आलेल्या प्रस्तावातून निवड करून देण्यात आला.
अपर्णा सिंग यांच्यासह चेअरमन सुकांत शहा, व्हाईस चेअरमन रमेश भुतडा, सचिव प्रियदर्शिनी, संदीप लाल व नील पत्रावर यांच्या समितीने अतिशय बारकाईने आलेल्या अर्जाची छाननी करून या पुरस्कारांची निवड केली. देशातील २७ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत अटल फाउंडेशन सेवा क्षेत्रात भरीव योगदान देत आहे. बाबू मन्सुरी अमरोहा, बबली हापूड त्यागी, प्रदीप चौधरी आणि यांच्यासारख्या मान्यवरांचे योगदान या संस्थेच्या कार्यात आहे. जम्मू काश्मीर ते केरळ आणि सिक्कीम ते गुजरात असे चौफेर फाउंडेशनचे काम सुरु आहे. आदरणीय वाजपेयीजींनी सांगितलेल्या मार्गावर सरकारी धोरणांबद्दल जागरुकता पसरवण्याचे आणि देशाच्या नाकोपऱ्यातही व्यक्तींची सेवा करण्याचे काम परिश्रमपूर्वक फाउंडेशन करते.
अपर्णा सिंग म्हणाल्या, “भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा वारसा आपल्या देशासाठी दिशादर्शक व प्रगतीकडे घेऊन जाणारा आहे. इंटरनॅशनल अवॉर्ड २०२३ सोहळ्याच्या माध्यमातून अटलजींच्या कार्याची ओळख जगभर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. अटलजींची तत्त्वे आणि दूरदृष्टी सीमा ओलांडून जगभरातील लोकांना एकत्र करण्याचे काम करते. मानवतेसाठी त्यांनी केलेले उल्लेखनीय योगदान जागतिक पातळीवर साजरे करत आहोत.”
डॉ. महेंद्र मुंजापुरा यांनी २०४७ मध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल, हा विचार अटलजींपासून प्रेरित असल्याचे नमूद केले. देशाच्या हितासाठी अटल फाऊंडेशनच्या प्रशंसनीय कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
श्याम जाजू यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनवादी नेतृत्वावर प्रकाश टाकला. राजेश ओझा यांनी अटलजींची शिकवणूक, त्यांचे विचार आणि जीवनात शांत राहण्याचे महत्व अधोरेखित करतानाच अटल फाऊंडेशनच्या समाजातील योगदानाबद्दल कौतुक केले.
जागतिक स्तरावरील हा महत्वाचा सन्मान मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जगभरात असलेले ९० हजारपेक्षा माजी विद्यार्थी आणि सर्वच स्टेकहोल्डरच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, अटलजींच्या नावाचा हा पुरस्कार जागतिक स्तरावर मिळणे ही आनंदाची बाब आहे. संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. अटलजींनी दिलेल्या अनेक तत्वांचा, आदर्शांचा ‘सूर्यदत्त’च्या कार्यात समावेश आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक स्तरावरचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण व सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जात आहे.