श्री स्वामी समर्थ व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प
पिंपरी, १७ मे – ‘केवळ घटनांची यादी म्हणजे इतिहास नव्हे; तर इतिहासातून राष्ट्रसमृद्धी आणि मानवी विकास घडतो!’ असे प्रतिपादन प्राचार्य प्रदीप कदम (pra. Pradip kadam) यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेत ‘इतिहासातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्राचार्य प्रदीप कदम बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते भास्कर रिकामे अध्यक्षस्थानी होते; तसेच व्याख्यानमाला समन्वयक राजेंद्र घावटे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जाधव, गोरख पाटील, बापू शिंदे, गोपीचंद जगताप, अनिल मुळे, राजाराम वंजारी, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविकातून, ‘यापूर्वी राजर्षी शाहूमहाराज ही व्याख्यानमाला पंधरा वर्षे चालवली. त्यामध्ये अनेक नामवंत वक्त्यांनी समाजप्रबोधन केले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करोना काळात खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक कामे करण्यात आली. आता आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसोबतच समाजप्रबोधन घडावे या उद्देशातून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे!’ अशी माहिती दिली. भास्कर रिकामे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘महाराष्ट्राला शेकडो वर्षांपासून व्याख्यानमालांची समृद्ध परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्य चळवळीत त्यामुळे जनमत संघटित होण्यास मदत झाली. या पार्श्वभूमीवर २००२ पासून पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीच्या माध्यमातून चांगले विषय अन् व्यासंगी वक्ते यांचा समन्वय साधला जातो. असे असले तरी श्रोत्यांनी वेळेवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून संयोजकांना सहकार्य करावे!’ असे आवाहन केले.
प्राचार्य प्रदीप कदम पुढे म्हणाले की, ‘आकाशापेक्षाही विशाल आणि मंदिराइतकाच पवित्र असा छत्रपती शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज यांचा इतिहास आहे. आजकाल आपल्या जाणिवा बोथट होत चालल्या आहेत. भावी पिढीसमोर आपण आपला जाज्वल्य इतिहास ठेवला पाहिजे. इतिहासावर भाष्य करणे ही काळाची गरज आहे; (Commenting on history is the need of the hour) कारण महापुरुषांच्या इतिहासातून प्रेरणा मिळते. त्यांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यावर प्रत्येक महापुरुषाने आपल्या जीवनात खूप मोठा संघर्ष केला आहे, हे लक्षात येते. शंभुराजे लहान असताना त्यांच्या कानात अन् मनात शिवाजीमहाराजांचा देदीप्यमान इतिहास रुजत गेला; आणि त्यामुळेच स्वराज्यात दुसरा छत्रपती निर्माण झाला. शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज यांच्या इतिहासापासून अनेक महापुरुषांनी प्रेरणा घेतली. शरीराने सुदृढ असलेले मावळे इतिहास घडवू शकले म्हणून ज्याचा पराक्रम कधीच मावळत नाही तोच मावळा! असे म्हटले जाते. महापुरुषांची उंची त्यांच्या समर्पणावरून मोजली जाते. ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची असतात, ती माणसे झोपत नाहीत; तसेच कारणे सांगणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत!’ महात्मा फुले, राजर्षी शाहूमहाराज, डाॅ. आंबेडकर यांचे संदर्भ, छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासातील प्रसंग; तसेच कविता आणि शेरोशायरी उद्धृत करीत प्राचार्य प्रदीप कदम यांनी अभिनिवेशपूर्ण वक्तृत्वशैलीतून विषयाची मांडणी केली.
राजेंद्र घावटे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कल्याण वाणी, किशोर थोरात, नंदकुमार शिरसाठ, प्रशांत पाटील यांनी संयोजनात सहकार्य केले. तेजस्विनी बडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिक पाटील या नवयुवकाने आभार मानले.