शहरव्यापी लोककल्याणकारी प्रकल्पांना मिळाली चालना
पिंपरी, दि. ५ – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरी सुविधा आणि लोककल्याणात्मक विकासासाठी सी.एस.आर अंतर्गत दीर्घकालीन भागीदारी सशक्त करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथे विशेष बैठकीचे आयोजन ( Pimpri Chinchwad Municipal Corporation organized a special meeting in Chinchwad with the aim of strengthening long-term partnerships under CSR for urban amenities and public welfare development in the city. ) करण्यात आले. या बैठकीत ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण या मूलभूत क्षेत्रांतील नागरिकाभिमुख पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. ते यावेळी म्हणाले, “शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता सर्वसमावेशक विकास अत्यावश्यक आहे. यासाठी केवळ निधी नव्हे तर सीएसआर क्षेत्रातील कंपन्यांचा अनुभव, कौशल्य आणि मानव संसाधनाचाही सहभाग आवश्यक आहे.’’ तसेच त्यांनी मोरवाडीतील दिव्यांग भवन – देशातील एक अत्याधुनिक दिव्यांग बांधवांसाठीचे केंद्र, लाइटहाउस कौशल्य विकास उपक्रम, भोसरीतील शिवणकला केंद्र, तसेच मोशीतील शास्त्रशुद्ध घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांसारख्या महत्त्वपूर्ण सीएसआर प्रकल्पांचा उल्लेख केला. “सीएसआरचा वापर करून महापालिकेच्या शहरी विकासाच्या प्राधान्यक्रमाशी संलग्न राहून उभारलेले हे प्रकल्प समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी आणि सीएसआर प्रमुख नीळकंठ पोमण यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले की, “महापालिका गेली पाच वर्षे सातत्याने या विशेष बैठकीचे आयोजन करत आहे. त्यातून रुग्णालये, शाळा, तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळाली आहे. शहरात सीएसआरचा प्रभाव नागरिकांना स्पष्टपणे दिसत आहे आणि याला आणखी व्यापक करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.”
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उपआयुक्त सचिन पवार, पंकज पाटील, सहायक आयुक्त उमेश ढाकणे, प्रशासन अधिकारी संगिता बांगर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी विविध विभागांतर्गत प्रस्तावित प्रकल्पांची माहिती देत सीएसआर प्रतिनिधींशी थेट संवाद साधला.
विविध कंपन्यांच्या सीएसआर प्रतिनिधींनी त्यांच्या चालू व नियोजित प्रकल्पांची सादरीकरणे केली, तर महापालिकेच्या विभागप्रमुखांनी विविध सहकार्याच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सीएसआर सल्लागार विजय वावरे आणि श्रुतिका मुंगी यांनी महापालिकेस मागील दोन वर्षांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या सन्मानांचा आणि सीएसआरद्वारे साध्य झालेल्या विकासकामांचा आढावा दिला.
कार्यक्रमाचा समारोप करताना सीएसआर सेल प्रमुख निळकंठ पोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि पिंपरी चिंचवडला अधिक समावेशक, शाश्वत व भविष्याभिमुख शहर बनवण्यासाठी दीर्घकालीन सीएसआर भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले.