पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी उपक्रम
पिंपरी, दि. २- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांचे रक्षण या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील प्रमुख विसर्जन स्थळांवर निर्माल्य संकलन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विसर्जनावेळी हार, फुले, माळा, पाने आणि अन्य पूजेसाठी वापरलेले साहित्य थेट नदी-नाल्यात किंवा पाण्यात न टाकता या कुंड्यात टाकावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक वर्षी विसर्जनावेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी शहरभरात निर्माल्य संकलन कुंडे (Clean collection tanks throughout the city ) बसवण्यात आली आहेत. या कुंड्यात जमा झालेले निर्माल्य पुढील प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मितीसाठी वापरले जाणार असून, त्याचबरोबर त्यावर प्रक्रिया करून सुगंधी द्रव्ये तयार करण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य नदीपात्रात न टाकता निर्माल्य संकलन कुंडामध्ये टाकावे, असे आवाहन (Appeal to citizens to throw waste in the collection tank instead of throwing it in the river.) करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे केवळ नदी-नाल्यांतील प्रदूषण कमी होणार नाही, तर जमा झालेले निर्माल्य सेंद्रिय खत आणि सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी वापरल्याने पुनर्वापर संस्कृतीला चालना मिळणार आहे. शहरात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या तिन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी आवर्जून निर्माल्य कुंडांचा वापर करावा. नद्या, तलाव स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास हा उपक्रम यशस्वी होईल आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला साजरा करता येईल.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.