पिंपरी, ११- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिन’ तर ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. ( October 3rd will be celebrated as ‘Classic Marathi Language Day’ and ‘Classic Marathi Language Week’ will be celebrated from October 3rd to October 9th, 2025.) या काळात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणारे विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी, मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता बैठक आयोजित केली आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात ही बैठक होईल, अशी माहिती महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड (Kiran Gaikwad, Special Officer of the Municipal Corporation and Marathi Language Coordination Officer, gave this information.) यांनी दिली आहे.
‘अभिजात मराठी भाषा दिन’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ काळात, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अभिजात मराठी भाषा संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे यांचे आयोजन, अभिजात मराठी भाषा ग्रंथ परंपरेची विद्यार्थी व सामान्य जनतेला ओळख करून देण्यासाठी मराठी ग्रंथ व साहित्यांचे प्रदर्शन, अभिजात मराठी भाषेतील प्राचीन ग्रंथ संपदेचे समकालीन मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, शाळा व महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजुषा, निबंधलेखन, वकृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन, तसेच अभिजात मराठी भाषेशी संबंधित इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नियोजन आहे. यावर सविस्तर विचारविनमय ११ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित बैठकीत करण्यात येणार आहे. तरी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, साहित्यिक तसेच मराठीप्रेमी नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले आहे.