पुणे : स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील भरीव, उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ स्थापत्य अभियंता रावसाहेब उर्फ आर. बी. सूर्यवंशी यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणेच्या वतीने ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के जीवनगौरव पुरस्कार-निर्माण रत्न’ देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. २५ व्या ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन’चे पारितोषिक वितरण यावेळी झाले.
पुणे स्टेशन येथील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या कार्यक्रमास सौ. पुष्पा सूर्यवंशी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. एन. गुप्ता, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) संचालक अतुल गाडगीळ, ‘बीएआय’ महाराष्ट्र स्टेट चेअरमन रणधीर भोईटे, वेस्ट झोनचे उपाध्यक्ष नीरव परमार, बीएआय पुणेचे चेअरमन अशोक अटकेकर, सचिव हरप्रित आनंद, स्पर्धेचे चेअरमन जय पिंजानी यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सूर्यवंशी म्हणाले, “ज्यांच्या सहवासात राहून काम केले. गेली ५८ वर्षे ज्यांना आदर्श मानून जीवन जगलो. ज्यांच्या प्रेरणेने अभियांत्रिकी, बांधकाम क्षेत्रात जगभर काम करू शकलो, ते माझे गुरू पद्मश्री बी. जी. शिर्के यांच्या नावाने पुण्यात पुरस्कार मिळणे, हे माझ्यासाठी आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. अनेक सरकारी, औद्योगिक आणि निवासी प्रकल्प उभारण्यात योगदान देण्याची संधी मिळाली. ५८ वर्षांच्या कारकिर्दीत शिर्के कंपनीने खूप काही दिले. गुणवत्तापूर्ण काम आणि समाजभान याची शिकवण बी. जी. शिर्के यांनी दिली. या अविस्मरणीय प्रवासात कुटुंबियांनी, कंपनीतील सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा या पुरस्काराने दिली आहे.”
अतुल गाडगीळ म्हणाले, “महामेट्रो ही कंपनी केंद्र व राज्य सरकार स्थापित असून, सार्वजनिक क्षेत्रातील हे अतिशय आदर्श मॉडेल आहे. पुणे शहरात मेट्रोचे जाळे उभारले जात असून, अवघ्या चार वर्षात या प्रकल्पाला कार्यान्वित करण्याची किमया कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने झाली आहे. ११ हजार ४२० कोटींचा हा प्रकल्प सर्व सरकारी यंत्रणा, कामगारांचे योगदान यामुळे लवकरच पूर्ण होईल. मेट्रोचे सर्व स्टेशन तयार करताना स्थापत्य कलेची जोड दिली जात आहे.”
बीएआय पुणे हे बिल्डर्स असोसिएशनचे पहिले आणि सर्वात मोठे केंद्र आहे. या संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून येताना आनंद वाटतो. कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्वच घटकांच्या कल्याणासाठी ‘बीएआय’ने सातत्याने उपक्रम राबवावेत, असे आर. एन. गुप्ता यांनी सांगितले. अशोक अटकेकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. महेश मिरानी यांनी सूत्रसंचालन केले. हरप्रीत आनंद यांनी आभार मानले.
रौप्यमहोत्सवी वर्षातील स्पर्धेचे विजेते
‘वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन-२०२१’ या रौप्यमहोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. प्राईड बिल्डर्स (रेसिडेंसियल), प्राईड बिल्डर्स (रेसिडेंसियल हौसिंग कॉम्प्लेक्स), बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी (रेसिडेंसियल अफॉरडेबल हौसिंग), रत्नरुप प्रोजेक्ट्स (कमर्शियल), भाटे अँड राजे कंपनी (इंडस्ट्रीयल), टीएनटी इन्फ्रा लिमिटेड व वृक्ष लँडस्केप (इन्फ्रास्ट्रक्चर), एसकॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (गव्हर्नमेंट), एस. जे. कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड (वेल इक्विप अँड वेल मेकनाईज साईट), मिलेनियन इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स (वर्क अप टू बेअर स्केल) या संस्थांना वेगवेगळ्या प्रकारात उत्कृष्ट बांधकामासाठी पारितोषिक मिळाले.