राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वर्गीय विनायकराव मेटे यांना
‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार; डॉ. ज्योती मेटे यांनी केला स्वीकार
पुणे/मुंबई: राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार (मरणोत्तर) शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे यांना प्रदान करण्यात आला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विनायकराव मेटे यांच्या नावाची घोषणा होताच मंचावर आणि सभागृहात उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, उपस्थिती, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, कौशल्य, निवडलेले मुद्दे, वक्तृत्व शैली, दर्जेदार उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळून पाहून पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून या पुरस्काराची शिफारस केली होती. त्यानुसार राष्ट्रकूल संसदीय मंडळाकडून २०२०-२०२१ या वर्षाकरिता हा पुरस्कार जाहीर झाला होता. तीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण, अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकासाठी रस्त्यावरची लढाई लढतानाच विधीमंडळातही आक्रमक आणि अभ्यासू मांडणी करणाऱ्या मेटे यांना हा पुरस्कार मिळाल्याने बीड जिल्ह्यासह सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नॉर्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.
मराठा महासंघातून मराठा आरक्षण लढ्यात सामील झालेले दिवंगत मेटे २७ वर्षे विधान परिषदेचे सदस्य राहीले. सर्वाधिक वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा त्यांचा विक्रम कायम आहे. मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाकरिता विद्या वेतन व मार्गदर्शनाकरिता सारथी या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेची संकल्पनाही मांडण्यातही त्यांचा पुढाकार होता. पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. आक्रमक आणि अभ्यासू भाषणाने मेटे यांनी कायम विधीमंडळाचे सभागृह दणाणून सोडले. १४ ऑगस्ट २०२२ रोजी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीला जाताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. परंतु, त्यांच्या कर्तृत्वाचा उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने त्यांच्या पश्चात् सन्मान झाला.

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                