दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये ‘सूर्यदत्त योगवारी यात्रा आरोग्याथॉन-२०२४’चे आयोजन
पुणे: दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् पुणे तर्फे ‘सूर्यदत्त योगवारी यात्रा आरोग्याथॉन’चे सकाळी १० ते १२ या वेळेत आयोजन करण्यात आले. पंढरीची वारी, विविध धार्मिक यात्रा आणि शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या या अनोखा उपक्रमाची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सूर्यदत्तमधील विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत योगासने व गाण्यांवर आधारित नृत्य सलग दोन तास सादर केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. योगशिक्षिका सोनाली ससार व सविता गांधी यांनी योग प्रात्यक्षिके घेतली. सूर्या द एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रशांत पितालिया, प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, वंदना पांडे, हेमंत जैन यांच्यासह सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सर्वांसाठी पौष्टिक नाश्त्याचे नियोजन केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “योग दिनानिमित्त दरवर्षी सूर्यदत्तमध्ये आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याआधी कला आरोग्यम योगाथॉन, ताल आरोग्यम योगाथॉन आदी विक्रमी उपक्रमाचे आयोजन केले असून, त्याची नोंद विविध जागतिक दर्जाच्या संस्थांनी घेतलेली आहे. यंदा ‘सूर्यदत्त योगवारी यात्रा आरोग्याथॉन’ हा उपक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पुण्यभूमीत संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विठ्ठल भक्तीला मोठा वारसा आहे. लाखो लोक देहू-आळंदी ते पंढरपूर अशी वारी करतात. हजारो लोक यात्रा करून येतात. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासह चांगला आहार गरजेचा असतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ‘आचार, विचार आणि आहार’ असा त्रिवेणी संगमाची एक नवीन संकल्पना राबविण्यात आली.”
“वारकरी ज्याप्रमाणे पायी वारी करतात, ताल आणि ठेका धरतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी वारीच्या व धार्मिक गीतांवर योग व नृत्य केले. यामध्ये विविध प्रकारचे आसने सलग १२० मिनिटे केल्याची नोंद झाली. सर्वात जास्त वेळ सूर्यनमस्कार करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व रोख बक्षीस देण्यात आले. योगाच्या माध्यमातून भक्तिमय पद्धतीने जागतिक शांतता नांदावी, तसेच येऊ घातलेली वारी, सर्व यात्रा या सुखद व्हाव्यात, यासाठी वैश्विक प्रार्थना करण्यात आली. उपक्रमावेळी डॉक्टर, स्वयंसेवक योग करणाऱ्यांवर लक्ष ठेवून होते. कुणाला त्रास झाला, तर त्याला लगेच तपासणी करून योग्य वैद्यकीय सेवा दिली जात होती. अशा प्रकारचा हा विक्रम भारतातच नव्हे, तर जगात पहिल्यांदाच झाला असावा, असे आम्हाला वाटते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहून एक उज्वल पिढी घडावी, यासाठी असे उपक्रम महत्वपूर्ण ठरतात,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
मुलांनी घातले सव्वाशे सूर्यनमस्कार
सलग दोन तास योग प्रात्यक्षिके केल्यानंतर सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये २० मुलांनी सहभाग घेतला. त्यातील दोन मुलांनी १२५ सूर्यनमस्कार, तर काही मुलांनी ७० पेक्षा अधिक सूर्यनमस्कार घातले. या स्पर्धेत नीरज बुब (प्रथम), कोमल श्रीश्रीमल (द्वितीय), सानिका भाटकर (तृतीय), ओंकार राऊत व पूर्णिमा शिराळकर (उत्तेजनार्थ) यांनी रोख बक्षीस मिळवले.