सीओईपी महाविद्यालयात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरतर्फे ‘पुणे व्हिजन २०५०’चे आयोजन

सीओईपी महाविद्यालयात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरतर्फे ‘पुणे व्हिजन २०५०’चे आयोजन

पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती व्हावी : डॉ. हनुमंत धुमाळ
सीओईपी महाविद्यालयात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरतर्फे ‘पुणे व्हिजन २०५०’चे आयोजन
 
पुणे: जलसुरक्षा हे फक्त सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. ‘जलसुरक्षा आणि हवामान लवचिकता’ या विषयावर केवळ परिषदा न घेता नागरिकांनी  जागरूक होणे महत्वाचे आहे. येणाऱ्या काळात पाणीटंचाईची समस्या भीषण होऊ नये, यासाठी याकडे गांभीर्याने पाहून पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती व्हायला हवी,” असे मत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ यांनी व्यक्त केले. विकास म्हणजे केवळ मानवाला मिळणाऱ्या सोयीसुविधा नव्हेत, तर पर्यावरणाचे संरक्षण हाही महत्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) बांधकाम क्षेत्राशी संबंधित घटकांसाठी आयोजित ‘पुणे व्हिजन २०५०’ या परिसंवादात डॉ. धुमाळ बोलत होते. याप्रसंगी जीवित नदी संस्थेच्या संस्थापिका शैलजा देशपांडे, ‘एईएसए’चे चेअरमन महेश बांगड, ‘बीएआय’चे अध्यक्ष सुनील मते, उपाध्यक्ष अजय गुजर, सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदार पाटील, समन्वयक संजय आपटे आदी उपस्थित होते. पाण्याचा सुयोग्य वापर, जल सुरक्षा व गुणवत्ता, हवामान बदल, पायाभूत टिकाऊपणा, २०५० मधील पाण्याची उपलब्धता, लोकवस्त्यांचे व्यवस्थापन या विषयांवर या परिसंवादात चर्चा झाली. शैलजा देशपांडे, महेश बांगड यांनी मार्गदर्शन केले.

शैलजा देशपांडे म्हणाल्या, “नद्यांच्या बाजूला अनैसर्गिक झाडांची लागवड करण्याऐवजी नैसर्गिकरित्या उगवणारी स्थानिक वनस्पती हटवू नये. मानवाला लागणारा सर्वात जास्त ऑक्सिजन हा वातावरणामधून तसेच समुद्रभागातून येतो. जो समुद्र / नद्यांमधील वनस्पतींमध्ये तयार होतो. त्यामुळे नद्यांमध्ये स्थानिक आणि नैसर्गिक जलीय वनस्पती असणे महत्वाचे आहे. पाणी साठवून ते वर्षभर वापरता यावे, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.”

महेश बांगड म्हणाले, “प्रत्येक साईटवरील पाणी वापराचे बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर ऑडिट व्हावे. त्यामुळे बांधकामाला लागणाऱ्या पाण्याचा अंदाज येईल. अनावश्यक पाणी वाया जाणार नाही. इतर देशांप्रमाणे बांधकाम क्षेत्र व कंपन्यांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर निर्बंध आणावेत. पाण्याचा पुनर्वापर सक्तीचा करावा त्यामुळे पाण्याचा वापर, पाणी प्रदूषण या दोन्ही गोष्टींना आळा बसेल व पर्यावरणाची हानी होणार नाही.”

यावेळी ‘सीओईपी’च्या विद्यार्थ्यांना बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी येथे दोन महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुनील मते यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संजय आपटे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम हजारे आभार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *