पुणे : जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त बिबवेवाडी येथे आयोजित मौखिक व दंत आरोग्य तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते गौरव गणेश घुले यांच्या पुढाकारातून एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस आणि रोटरी क्लब ऑफ सिनर्जी पुणे यांच्या सहकार्याने या तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी गौरव गणेश घुले, निर्मला घुले, रोटरीच्या प्रकल्प प्रमुख डॉ. श्रुती गर्दे, क्लबचे अध्यक्ष लोकेश छाजेड, सचिव श्री. गिके, रंगूनवाला महाविद्यालयाचे डॉ. रमणदीप दुगल, सामाजिक उपक्रम प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण यांच्यासह कर्मचारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या शिबिरात ३१७ लोकांची मौखिक व दातांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तोंडाचा कर्करोग, लहान मुले व प्रौढांच्या दातांची तपासणी, रूट कॅनल तपासणीसह दातांची सफाई व पॉलिश, वाकडे व पुढे आलेल्या दातांची तपासणी, दात काढणे व आवश्यक ते सल्ला मार्गदर्शन करण्यात आले.
गौरव घुले म्हणाले, “तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मौखिक, तसेच दातांचे आरोग्य बिघडत आहे. दात आणि तोंड हा आपला एक महत्वाचा भाग असून, त्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याची गरज आहे. या शिबिरामार्फत जागृतीसह तपासणी आणि उपचार सल्ला मार्गदर्शन करण्यात आले.”