संमेलनाध्यक्षपदी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, तर स्वागताध्यक्षा सुनिता कपाळे
पुणे: विश्वबंधुता साहित्य परिषद आणि दर्पण प्रकाशन पुणे या संस्थांच्या वतीने येत्या २६ नोव्हेंबर २०२४ रोजी, संविधानदिनी लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षपदी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री सुनिता कपाळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक, प्रकाशक गुलाबराजा फुलमाळी यांनी दिली.
गुलाबराजा फुलमाळी म्हणाले, “या संमेलनामधे शंभराहून अधिक कवी सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता पहिल्या विश्वबंधुता विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. सविता पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रसंगी ११४ कवींच्या रचनांचा ‘विश्वबंधुतेचा बोधीवृक्ष’ हा काव्यसंग्रह प्रकाशित होईल. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांवर आधारित या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना आहे. संमेलनाच्या यशस्वितेसाठी डॉ. बंडोपेत कांबळे व प्रा. प्रशांत रोकडे परिश्रम घेत आहेत. ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे व संगीता झिंजुरके हे या महाकवी संमेलनाचे संचालन करणार आहेत.”