२८ एप्रिल ते १ मे दरम्यान ‘घे भरारी’ प्रदर्शनात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘मावळा’ बोर्डगेमचा उपक्रम
पुणे : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे धडे खेळाच्या माध्यमातून गिरवण्याची, तसेच मुलांना खेळाच्या मैदानात शिवरायांचा ‘मावळा’ बनून इतिहास अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. २८ एप्रिल ते १ मे २०२२ या कालावधीत डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ११ ते रात्री ९ होत असलेल्या ‘घे भरारी’ या महिला व्यावसायिकांच्या भव्य प्रदर्शनात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘मावळा’ या बोर्डगेम बनवणाऱ्या मिती इन्फोटेनमेंटतर्फे ‘घे भरारी’ प्रदर्शनात हा अनोखा उपक्रम मुलांकरिता विनामूल्य आयोजित केला आहे, अशी माहिती अनिरुद्ध राजदेरकर, व्यंकटेश मांडके व शंतनु कुलकर्णी ह्यांनी दिली प्रसंगी घे भरारी प्रदर्शनाचे संयोजक राहुल कुलकर्णी व नीलम उमराणी-एदलाबादकर हे उपस्थित होते.
अनिरुद्ध राजदेरकर म्हणाले, “मिती इन्फोटेनमेंट या पुण्यातील संस्थेने बनवलेल्या ‘मावळा’ ह्या बोर्ड गेमने राष्ट्रीय पातळीवर भरलेल्या भारतीय खेळांच्या स्पर्धेत ‘टॉयकॅथॉन’मध्ये नुकतेच विजेतेपद मिळवले आहे. शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत १०१ घटनांवरील प्रवास महाराजांचा मावळा बनून अनुभवता येणार आहे. या प्रवासात शिवछत्रपतींसाठी लढलेले तब्बल २० स्वराज्ययोद्धे तुम्हाला या खेळात साथ देतात, तुम्ही दहा दुर्गांचे राखणदार बनता आणि राज्याभिषेकाला सर्वस्व स्वराज्याला अर्पून मानाचे स्थान मिळवता, असे या खेळाचे स्वरूप आहे. या प्रदर्शनात चारही दिवस रोज ५ ते ९ या वेळात ‘रणांगण’ हा खेळ रंगणार आहे.”
“हा खेळ सर्वसामान्यांपर्यंत अगदी सहज पोहोचावा, लहान मुलांना स्वराज्यलढ्याचा थरार अनुभवता यावा यासाठी ‘घे भरारी’ प्रदर्शनात जगातील सर्वात मोठ्या मराठी बोर्ड गेम प्रचंड स्वरूपात आणत एकाच वेळी १०० हून अधिक मुले हा खेळ खेळू शकतील, अशी व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त स्वराज्यासाठी लढलेल्या ६० स्वराज्ययोद्ध्यांना मिती इन्फोटेनमेंटने त्यांच्या कल्पनेतून चित्रांत उतरवले आहे. या उपक्रमाद्वारे भावी पिढीला काल्पनिक पाश्चात्य सुपरहिरोंना अस्सल मराठी पर्याय देण्याचा प्रयत्न आहे. ‘अफझलखान स्वारी’ या विषयावर असलेल्या ‘शेर शिवराज’ या आगामी चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत, हेही या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. सर्व सहभागी मुलामुलींना डिजिटल कौतुकपत्र देण्यात येणार आहे, या विनामूल्य खेळात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९९६०८१२०१८ या क्रमांकावर किंवा the mavala या संकेतस्थळावर संपर्क साधावा .” असे राजदेरकर यांनी नमूद केले.
नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “महिलांसह सर्वांसाठीच वैविध्यपूर्ण उत्पादने, छोट्या दोस्तांसाठी भरपूर गेम्स, गोष्टीची पुस्तके, खेळणी बनवायचे वर्कशॉप, रंगकाम, पॉटरी मेकिंग असे उपक्रम या प्रदर्शनात असतील. हँडलूम कपडे, हँडमेड दागिने, ऑरगॅनिक प्रॉडक्ट, तांब्याची भांडी, कॉर्पोरेट गिफ्ट्स आदी स्टॉल्स असणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘मावळा’ हा रोमांचक गेम आणि अनेक मावळ्यांबरोबर सेल्फी हे या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. यासह खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आहेत. विविध प्रांतातून येणाऱ्या एक से एक साड्यांचे आणि वस्तूंचे डोळ्याचे पारणे फेडणारे कलेक्शन येथे बघायला मिळेल. ‘घे भरारी’ ग्रुप लघु उद्योजकांना व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे प्रदर्शन २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन छोट्या व्यवसायीकांना प्रोत्साहित करावे.”