‘सूर्यदत्ता’ घेणार ६१ पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

‘सूर्यदत्ता’ घेणार ६१ पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

नैसर्गिक आपत्तीग्रस्त, पूरग्रस्त भागातील ६१ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ‘सूर्यदत्ता’ देणार शंभर टक्के शिष्यवृत्ती

 
पुणे : नैसर्गिक आपत्तीग्रस्त, पूरग्रस्त भागातील सर्वाधिक फटका बसलेल्या ६१ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार आहे. सूर्यदत्तामध्ये ११वी, १२वी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या ६१ विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यासक्रम विनाशुल्क असणार आहे, अशी माहिती सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया आणि मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया यांनी दिली. सुषमा चोरडिया म्हणाल्या, “कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या इतर काही जिल्ह्यात महापूर, दरड कोसळून, भूस्खलन होऊन उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांचे जीव गेले. या संकटकाळात अनेकांकडून मदतीचा हात दिला जात आहे. अशावेळी शिक्षणसंस्थेची सामाजिक जबाबदारी म्हणून, तसेच सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या एकसष्टीनिमित्त या आपत्तीग्रस्त भागातील सर्वाधिक फटका बसलेल्या ६१ मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय ‘सूर्यदत्ता’तर्फे घेण्यात आला. सूर्यदत्ता एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत महापूर किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त विद्यार्थ्यांना या १०० टक्के शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. निवास-भोजनाची सोय विद्यार्थ्याने स्वतः करायची आहे. पुण्यात अनेक चांगली वसतिगृहे आणि खाणावळीही माफक दरात उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचीही माहिती घेऊन थेट तेथे संपर्क करावा.”
सिद्धांत चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्ताच्या कोणत्याही शाखेत ज्युनियर कॉलेज (११वी, १२वी)/ पदविका/ पदवी (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा पदव्युत्तर पदवीसाठी (दोन वर्षाचा अभ्यासक्रम) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला ही सुविधा मिळेल. ११वी, १२वी आर्टस्, कॉमर्स, सायन्स, पदवीमध्ये बीबीए, बीबीए आयबी, बीबीए सीए, बीए, बीकॉम, बीएस्सी (होम सायन्स, सायबर अँड डिजिटल सायन्स, कम्प्युटर सायन्स, अनिमेशन, फॅशन डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट), डिप्लोमा अँड ऍडव्हान्स्ड डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन, इव्हेन्ट मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रम, तर पदव्युत्तर पदवीमध्ये एमकॉम, एमएस्सी कम्प्युटर सायन्स, एमबीए, एमएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि पीजीडीएम हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे सर्व अभ्यासक्रम शासन मान्यताप्राप्त असून, या सर्व अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती लागू असेल. पात्र विद्यार्थ्यांनी आपत्ती ग्रस्त असल्याचे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी किंवा समस्तर अधिकाऱ्याचे पत्र व इतर आवश्यक कागदपत्रांसह २० ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करावा. हा अर्ज support@suryadatta.edu.in या ईमेलवर पाठवावा किंवा www.suryadatta.org या संकेतस्थळावर जाऊन भरावा. अधिक माहितीसाठी स्वप्नीशा (०२०-६७९०१३००) किंवा सुनील धाडीवाल (८९५६९३२४१७) यावर संपर्क साधावा.”
“याआधीही ‘सूर्यदत्ता’ने गरीब, गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक प्रायोजकत्व दिलेले आहे. तसेच या उपक्रमांतर्गत दरवर्षी १०० नोकरदारांना उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. ‘सूर्यदत्ता’च्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी आपले करियर घडवले आहे. त्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरल्याचे समाधान आहे,” असेही चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *