पुणे : समवेदना संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘मना तुझे मनोगत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या गुरुवारी (दि. १६) सायंकाळी ५.३० वाजता एमईएस बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. देणगीदार व हितचिंतकांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
डॉ. सलील कुलकर्णी पालकत्व, मुलांशी संवाद, नातेसंबंध व कथाकथन अशा विविध विषयांवर गप्पा, संगीत, गाणी व कवितांच्या माध्यमातून त्यांच्या अनोख्या शैलीत मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर ‘समवेदना’चे संस्थापक डॉ. चारुदत्त आपटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती ‘समवेदना’चे मुख्य व्यवस्थापक अमर पवार यांनी दिली.
समवेदना संस्था आरोग्य क्षेत्रात काम करत असून, उपचार, प्रतिबंध आणि प्रसार या त्रिसूत्रीवर आधारित विविध उपक्रम राबविते. गरीब रुग्णांना आर्थिक मदत, शालेय आरोग्य व महिलांसाठी कॅन्सर उपक्रम सोबत मानसिक स्वास्थ्य चा विषय नव्याने हाती घेतला आहे. यंदा समवेदना उपक्रमांचा २०,००० हून अधिक शहरी गरीब व ग्रामीण व्यक्तीनी लाभ घेतला. यामध्ये १२००० पेक्षा अधिक शालेयवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांसोबत काम करताना त्यांच्या सामाजिक आणि मानसिक समस्या समोर येत आहेत. त्याच अनुषंगाने यावर्षीचा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे, असे अमर पवार यांनी नमुद केले.