पुणे : विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळातर्फे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील चरई, वडाचा कोंड व रानवडी येथील १ ली ते १० वीच्या १०८ मुलामुलींना संपूर्ण शैक्षणिक साहित्य देण्यात आले. माजी विद्यार्थी मंडळाचे खजिनदार संतोष घारे, सहखजिनदार गणेश काळे, सहसचिव मनीषा गोसावी व माजी विद्यार्थी गणेश ननावरे यांनी या शाळांना भेटी देऊन साहित्याचे वाटप केले. या कामात मंडळाचे सदस्य निसार चौगुले व गणेश काळे यांनी पुर्ण नियोजन केले.
मंडळाचे अध्यक्ष राजु इंगळे म्हणाले, “जुलै महिन्यात आलेल्या महापुराचा रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने घेण्यात आला. या पट्ट्यामध्ये आदिवासी वस्ती असून, मजुरी हीच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. या तीन गावच्या शाळांमध्ये १०८ मुले शिकतात. महापुराचा फटका बसल्याने पालक मुलांना शैक्षणिक साहित्य खरेदी करु शकत नव्हते. चरई शाळेच्या शिक्षकांनी मंडळाशी संपर्क करून मदतीची विनंती केली. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत मंडळाने लगेचच या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचे ठरवले. या कामाचे सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार व समिती परिवाराचे मंडळ ऋणी आहे.”