डॉ. प्रमोद चौधरी यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स तर्फे जीवनगौरव पुरस्कार

डॉ. प्रमोद चौधरी यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स तर्फे जीवनगौरव पुरस्कार

 
डॉ. प्रमोद चौधरी यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स तर्फे जीवनगौरव पुरस्कार

पुणे : “कोणत्याही उद्योगाच्या यशात ग्राहकाभिमुख सेवा, नाविन्यता आणि प्रामाणिकता महत्वाची असते. संशोधन, इनोव्हेशन व पर्यावरणपूरक उद्योग देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावतो. त्यादृष्टीने नवउद्योजकांना घडवायला हवे,” असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स (आयआयसीएचई) रिजनल सेंटरच्या वतीने डॉ. प्रमोद चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने डॉ. चौधरी यांचे ‘प्राज इंडस्ट्रीजचा प्रेरणादायी प्रवास’ यावर बीजभाषण झाले. सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘आयआयसीएचई’ पुणे रिजनल सेंटरचे मानद अध्यक्ष आलोक पंडित, सचिव डॉ. उत्कर्ष माहेश्वरी, खजिनदार डॉ. प्रफुल्ल गर्गे, कार्यकारी समिती सदस्य यशवंत घारपुरे, प्राज इंडस्ट्रीजचे डॉ. प्रमोद कुंभार, डॉ. रवींद्र उटगीकर, घनश्याम देशपांडे, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडवान्सड टेक्नॉलॉजीचे डॉ. पवन खन्ना, ‘आयआयसीएचई’ पुणे रिजनल सेंटरचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुयोग तराळकर आदी उपस्थित होते.
 
डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “हवामान बदल आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या नव्या स्थितीला समर्थपणे तोंड देण्यास सज्ज उद्योग-व्यापारी संस्था उभी करणे हे सध्याच्या काळात नेतृत्वपदी असलेल्या व्यक्तींसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. ऊर्जा, पाणी, वाढते तापमान अशा अनेक गोष्टींचा सामना आपल्याला आगामी काळात करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीने संशोधनावर अधिकाधिक भर देऊन येऊ घातलेल्या या समस्यांवर उपाययोजना करायला हव्यात.”
 
“गेल्या चार दशकांपासून जैवतंत्रज्ञान क्षेत्रात विश्वासार्ह सेवा पुरवत आहे. त्याला पर्यावरणपूरकतेची जोड दिली आहे. शाश्वत उर्जेवर आम्ही काम करत आहोत. उद्योगासोबतच सामाजिक बांधिलीकीच्या भावनेतून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. पर्यावरण, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम सुरु आहेत. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी जोडून घेतले असून, त्यातून स्टार्टअप, आंत्रप्रेन्युअरशिप विकसित करण्यावर भर दिला जात आहे,” असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.
 
यशवंत घारपुरे, डॉ. सुभाष वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केले. अलोक पंडित यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. उत्कर्ष माहेश्वरी यांनी आभार मानले. 
—————————————-
डॉ, प्रमोद चौधरी यांच्या टिप्स 
– शाश्वत उद्योगासाठी नफ्यापेक्षा उच्च ध्येय अधिक महत्वपूर्ण
– इनोव्हेशन ही उद्योगासाठी पर्याय नव्हे, तर प्राथमिकता
– ग्राहक केंद्रबिंदू ही यशस्वी उद्योगाची किल्ली
– यशस्वी उद्योगासाठी उद्यमशीलता गरजेची 
– लोक हीच खरी संपत्ती, त्यांच्या प्रतिभेला चालना द्यावी
– सहकार्य आणि भागीदारी यशात महत्वाचे
– रोख भांडवल राजा; खर्चाच्या व्यवस्थापनात विवेकबुद्धी आवश्यक
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *