हौशी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे, दि. १५- “निसर्ग सौंदर्याचे वैविध्यपूर्ण अविष्कार, देश-विदेशातील वास्तू, नयनरम्य ठिकाणांची, भवतालातील सांस्कृतिक छटांची सफर घडवणारी छायाचित्रे रमेश करमरकर (ramesh karmarkar) यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहेत. ही मनमोहक छायाचित्रे पाहताना आपण प्रत्यक्षात तिथे जाऊन ती पाहत आहोत, अशी अनुभूती मिळते. निसर्गाचे सौंदर्य टिपताना त्यातील बारकाव्यांवर खूपच कलात्मकपणे लक्ष दिले आहे,” असे मत निर्माती-अभिनेत्री व कलाकार भाग्यश्री देसाई यांनी केले.
ज्येष्ठ हौशी व मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण, पारितोषिक प्राप्त छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते झाले. प्रसंगी रमेश करमरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ अँड सन्स कला दालनात २१ मेपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. बैलगाड्यांची शर्यत, आयफेल टॉवरचा अद्वितीय अँगल, नायगारा धबधबा, ट्युलिप फ्लॉवर्स, ब्राझीलमध्ये डोंगरावर सूर्यकिरण पडल्याने पाहायला मिळणारा ऊन-सावलीचा खेळ, बैलगाड्यांची शर्यत, वन्यजीव, आम्सटरडॅममध्ये वर्षभरात केवळ २५ दिवस उमलणारी फुले, रनिंगची मनमोहक छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
रमेश करमरकर म्हणाले, “गेल्या ५५ वर्षांपासून फोटोग्राफीचा छंद ) Photography hobby) जोपासला आहे. बेलोज कॅमेऱ्यापासून ते मिररलेस कॅमेऱ्याच्या वापरातून विविध देशांतील जीवनशैली, तेथील निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वैभव मला कॅमेऱ्यात टिपता आले. माझ्या छायाचित्राला महाराष्ट्र सरकारच्या प्रथम पारितोषिकासह भारत सरकार व इतर अनेक नामांकित संस्थांची पारितोषिके इतर अनेक छायाचित्रांना मिळालेली आहेत. छंद जोपासताना टिपलेली ही छायाचित्रे लोकांपर्यंत पोहोचावीत, या भावनेने हे प्रदर्शन आयोजिले असून, पुणेकरांनी प्रदर्शनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करतो.”