प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आर्यभट्ट हॉलचे उद्घाटन
पुणे : “तुम्ही शिकवत असलेल्या विषयावर आणि तुमच्या विद्यार्थ्यांवर तुमचे प्रेम असेल, तर कोणत्याही विषयात तुम्ही उत्तम शिक्षक बनू शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने विषय शिकवावा,” असा कानमंत्र भारतीय मराठी गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी दिला.
सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आर्यभट्ट जयंतीनिमित्त बावधन कॅम्पसमध्ये आर्यभट्ट हॉलचे उद्घाटन डॉ. मंगला नारळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आर्यभट्ट जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमावेळी सुर्यदत्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा डॉ. सुषमा चोरडिया, सहाय्यक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. नारळीकर यांना ‘सुर्यदत्त आर्यभट्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “मंगला नारळीकर गेली पन्नास वर्षे समर्पित वृत्तीने गणित हा विषय शिकवीत आहेत. त्यांनी शिक्षक म्हणून हजारो स्कॉलर्स निर्माण केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतून प्रेरणा घेऊन अनेकांनी गणितात मोठे काम केले आहे. गणित विषयाचे ज्ञान तुमची विश्लेषणाची शक्ती आणि कौशल्यांची वृद्धी करते. त्याद्वारे तुम्हाला स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्राप्त होते.”
आर्यभट्ट हे प्राचीन काळातील महान गणिती व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी जगाला दिलेल्या शून्याच्या योगदानामुळे गणित या शास्त्राचे संपूर्ण स्वरूप बदलून गेले. त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘सुर्यदत्त’मध्ये गणिताचा अभ्यासक्रम सुरू करणार असून, त्याद्वारे येथील शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वात महत्त्वाचे बदल घडतील, असा विश्वासही प्रा. डॉ. चोरडिया यांनी व्यक्त केला.
योगिता गोसावी, बाटू पाटील यांनी संयोजन केले. डॉ. सुखविंदर कौर यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पितालिया यांनी आभार मानले.