पुणे, दि. १९- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ येत्या २ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान (The first ‘Khasdar Krida Mahotsav’, initiated by Pune MP Muralidhar Mohol, will be held from November 2 to November 16, 2025. ) पार पडणार आहे. या १५ दिवसीय महोत्सवात शहरभरातील विविध मैदानांवर एकूण ३५ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा विविध खेळांच्या असोसिएशनच्या मदतीने आयोजित करण्यात येणार आहेत.
महोत्सवाचे प्रमुख समन्वयक आणि छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे (Manoj erande) यांनी सांगितले की, “या क्रीडा महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय पारंपरिक आणि ऑलिम्पिक स्पर्धांचा यात समावेश असून, सांघिक व एकेरी प्रकारात या स्पर्धा होणार आहेत.”
आर्चरी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, स्विमिंग, बास्केटबॉल, बॉडी बिल्डिंग, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, पिकलबॉल, रोलबॉल, शूटिंग, स्केटिंग, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉल क्लायम्बिंग, वॉटर पोलो, वेट लिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योग, स्क्वॅश यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष ऍथलेटिक्स व ज्येष्ठांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धा सणस मैदान, टिळक तलाव मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बालेवाडी क्रीडा संकुल, स. प. महाविद्यालय, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन जिमखाना, खराडी आदी ठिकाणी होणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये २० ते २५ हजार खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. खेळाडूंनी आपल्या संबंधित खेळाच्या असोसिएशनकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक मनोज एरंडे (९८२२०४५१०१) यांच्याशी संपर्क साधावा.
दीपोत्सवानंतर खेलोत्सव
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “राष्ट्रीय क्रीडा दिनी खासदार क्रीडा महोत्सवाची घोषणा केल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दीपोत्सवानंतर खेलोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. खासदार क्रीडा महोत्सव हा देशातील प्रतिभावान युवा खेळाडूंचा शोध घेणारा उपक्रम आहे. या महोत्सवातूनच ऑलिंपिकसारख्या सर्वोच्च जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू घडतील.
संपर्क:
मनोज एरंडे – प्रमुख समन्वयक
मो. ९८२२०४५१०१