आई हे जगातले सर्वोत्तम विद्यापीठ : प्रा. मिलिंद जोशी

आई हे जगातले सर्वोत्तम विद्यापीठ : प्रा. मिलिंद जोशी

जयगणेश व्यासपीठातर्फे विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान सोहळा

21 मातांचे पाद्यपूजन करून सुवासिनींनी केले औक्षण

पुणे, दि. ११ –  परमेश्वराने हे जग निर्माण केले आणि आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय येत राहावा यासाठी त्याने आईची निर्मिती केली. मुलांचे भावनिक भरणपोषण करणारी आई हे जगातले सर्वोत्तम विद्यापीठ आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी ( Milind joshi) यांनी व्यक्त केले.

जागतिक मातृदिनानिमित्त (mother’s day) जय गणेश व्यासपीठ, पुणेतर्फे आज (दि. 11) विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान सोहळ्याचे मराठाचेंबर ऑफ कॉमर्स येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रा. जोशी बोलत होते. आमदार हेमंत रासने,(mla hemant rasne) लक्ष्य फाऊंडेशनच्या प्रमुख अनुराधा प्रभुदेसाई, (anuradha prabhudesai)ॲड. प्रताप परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच्या विविध भागातील 21 मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मातांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर मुलांनी आपल्या आईचे पेढा भरवून तोंड गोड केले. सुरुवातीस सुवासिनींनी मातांचे औक्षण करून पाद्यपूजन केले.

पियूष शहा (साईनाथ मंडळ ट्रस्ट), विश्वास भोर (अखिल मंडई मंडळ), किरण सोनीवाल (वीर शिवराज मित्र मंडळ), प्रल्हाद थोरात (श्री शिवाजी मित्र मंडळ), राहुल जाधव (ओम हरिहरेश्वर मंडळ) यांच्या पुढाकारातून या हृद्य आणि भावस्पर्शी साहळा आयोजित करण्यात आला होता.

प्रा जोशी म्हणाले, या जगात जी गोष्ट आईसाठी म्हणून केली गेली ती अजरामर झाली आहे. पैशातील गुंतवणुकीइतकीच नात्यातील गुंतवणूक महत्वाची आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे .सार्वजनिक जीवनात कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्यांना हारांपेक्षा प्रहारच अधिक मिळतात. प्रसंगी टीका आणि अपमान सहन करावा लागतो. कार्यकर्त्यांनी कौतुकाने भारावून जायचे नसते आणि टीकेने व्यथित व्हायचे नसते. कसलीही अपेक्षा न ठेवता हे आभारशून्य काम करावे लागते. ते करत असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. घर व्यवस्थित असेल तरच बाहेरच्या लढाया लढता येतात.

प्रामाणिकपणा आणि कष्टाचे संस्कार आईकडून झाल्याचे सांगून आमदार रासने म्हणाले, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्याच्या आईचा सत्कार ही अभिवन कल्पना आहे. पुण्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख निर्माण करून देण्यात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे.

अनेक वर्षांपासून सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे, पण पहिल्यांदाच आईचा सन्मान होताना पाहात आहे.

अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे काम बघता तेही खऱ्या अर्थाने योद्धे आहेत. समाजासाठी काम करण्यासाठी कुटुंबियांचे पाठबळ आवश्यक असते. निस्वार्थ भावनेने कार्यकत समाजासाठी काम करीत आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सध्याची परिस्थिती बघता समाजाचा स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संकल्पनेविषयी प्रास्ताविकात माहिती देताना पियूष शहा म्हणाले, समाजासाठी वेळीअवेळी गणेश मंडळाचा कार्यकर्ता धावून जातो. समाजासाठी काम करण्याचे संस्कार आईमुळेच होतात. आईविषयी कृतार्थतेची भावना व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरुवातीस स्मिता जोशी, श्रुती वैद्य यांनी आईविषयक गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन पांडे यांनी केले. विश्वास भोर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *