अब्राहम स्टेफनोस यांचे मत; टाटा स्टीलकडून सारस डायलेसिस सेंटरला मदत
पुणे : “जसे आपण समाजाकडून घेतो, तसे आपण समाजाचे देणेही लागतो, याची जाण असणे आवश्यक असते. अलीकडे समाजासाठी काही करायचे म्हणजे पैसे द्यायचे, हा सोपा मार्ग अवलंबला जातो. पण त्याच सामाजिक कार्यासाठी पैशाबरोबर स्वतःचे श्रम, वेळ आणि गुणवत्ता देणेही तितकेच महत्वाचे आहे. हे महत्वाचे काम सारस डायलिसिस सेंटरमध्ये होताना दिसत आहे,” असे प्रतिपादन टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक अब्राहम स्टेफनोस यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग चॅरीटेबल ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या सारस डायलिसिस सेंटरला टाटा स्टील डाऊनस्ट्रीम प्रॉडक्ट्सच्या वतीने साधारण दोन लाख ७५ हजार रुपयांचे डायलिसिस साहित्य भेट देण्यात आले. यात २७५ डायलझर व ४३३ डायलझर ट्युबिंगचा समावेश आहे. येथील व्यवस्था, स्वच्छता व दर्जेदार सुविधा केवळ २०० रुपयात दिली जाते, हे पाहून सर्वजण भारावून गेले.
यावेळी टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्सचे सरव्यवस्थापक वेंकट पामपटवार, लायन्स क्लब ऑफ पुना चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन फतेचंद रांका, उपाध्यक्ष तुषार मेहता, आशा ओसवाल, सचिव प्रशांत कोठाडिया, लायन्स क्लबच्या अध्यक्षा दीपाली गांधी, खजिनदार पूनम अष्टेकर, डिस्ट्रिक्ट झोन अध्यक्ष दीपक सेठिया आदी सदस्य उपस्थित होते.
अब्राहम स्टेफनोस म्हणाले, “काम उत्तम असेल तर देणगी आपसूक मिळते. तुम्हाला देणगीदार शोधण्याची फारशी गरज पडत नाही. प्रत्यक्ष कार्य करणारे सारस डायलेसिसचे सर्व कार्यकर्ते आमचे हिरो आहेत. अशा सामाजिक कार्यातच ईश्वर सापडतो, असे मला वाटते. या कार्याचा मला भाग होता आले याचा आनंद आहे.” वेंकट पामपटवार यांनी डायलेसिस सेंटरतर्फे देण्यात येणाऱ्या सेवेचे कौतुक केले. तसेच टाटा समुहाच्या विविध सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. या क्लबसोबत आता कायमचे नाते जोडले गेल्याच्या भावना ही त्यांनी व्यक्त केल्या.
“देणगीतून मिळालेल्या या साहित्याचा उपयोग गरजू रुग्णांसाठी मोफत उपचारासाठी केला जाईल. या सहकार्याबद्दल टाटा समूहाचे आभार मानतो. गेली १४ वर्षे हे डायलेसिस सेंटर सुरु आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना येथे प्राधान्य दिले जाते. कोरोना काळातही हे एकमेव सेंटर चालू होते. या काळात रुग्णांकडून कुठलेही शुल्क घेतले नाही,” असे फतेचंद रांका यांनी नमूद केले.
क्लबमार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अजूनही काही सामाजिक प्रकल्प हाती घेण्यात येत असून, त्यांना साकार करण्यासाठी टाटा स्टीलने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही रांका यांनी केले. यावेळी टाटा ग्रुपच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. संस्थेचे उपाध्यक्ष तुषार मेहता यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव प्रशांत कोठाडिया यांनी आभार मानले.