पुणे-सातारा महामार्गाच्या दुरावस्था विरोधात जगदीश वाल्हेकर यांचे अनोखे आंदोलन
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील खड्डे, खचलेला रस्ता, अर्धवट कामाच्या निषेधार्थ पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रस्त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. मनसेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हा अध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन झाले. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही अंत्ययात्रा माई मंगेशकर हॉस्पिटल ब्रिज ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कार्यालय, वारजे नेण्यात आली. त्यानंतर एनएचएआय कार्यालयावर धडकल्यानंतर तेथे निवेदन देण्यात आले. 
यावेळी ‘एनएचएआय’चे मुख्य प्रबंधक सुहास चिटणीस यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ‘एनएचएआय’चे कायदेशीर सल्लागार ऍड. रणजित सारडे, वीरेंद्र साकोळकर, रिलायन्स इन्फ्राचे राकेश कोळी, मनसेचे अभिजीत गुधाटे, प्रवीण आग्रे, सूर्यकांत कोडीतकर, गौरव दांगट, सुरेश शिंदे, ईश्वर घोगरे, शांताराम कांबळे, आकाश गायकवाड, महेश कांबळे, अभिजित देशमुख, विशाल पठारे, आनंद गायकवाड आदी उपस्थित होते.
जगदीश वाल्हेकर म्हणाले, “पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग असून, या महामार्गावर लाखो वाहने धावतात. हा महामार्ग सहा पदरी करण्याचे ठरले. पण चार पदरी असलेल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचल्याने अपघात झाले आहेत. या रस्त्यावर महिलांसाठी कुठेही शौचालय नाही. याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून, वारंवार तक्रार करुनही रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारवर कडक कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्याकरता हे आंदोलन केले. याबाबत तातडीने पावले उचलली नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन मनसे करेल.”
सुहास चिटणीस म्हणाले, “जगदीश वाल्हेकर यांच्याकडून रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पाठपुरावा होत आहे. याची दखल घेऊन संबधित ठेकेदाराला महिन्याभरात रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शौचालयासंदर्भात लवकरच प्रस्ताव पाठवून त्याची उभारणी करण्याबाबत विचार केला जाईल.” राकेश कोळी यांनी पुढील १५ दिवस ते महिनाभरात संपूर्ण खड्डे भरले जातील, असे आश्वासन दिले.

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                