धर्मवीर गडावर संभाजी महाराजांची सृष्टी उभारावी – आमदार योगेश टिळेकर

धर्मवीर गडावर संभाजी महाराजांची सृष्टी उभारावी – आमदार योगेश टिळेकर

 येवलेवाडी-कोंढव्यापर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार करावा
 
पुणे, दि. ११-  स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, बलिदान संपूर्ण देशाला प्रेरक आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य सृष्टी उभी करावी. संगमेश्वरप्रमाणेच त्यांच्या गौरवशाली इतिहासाला जागवणारे स्मारक धर्मवीर गडावरही उभारावे, अशी मागणी विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांनी अधिवेशनात  (Legislative Council MLA Yogesh Tilekar demanded in the session that a memorial commemorating their glorious history should be erected at Dharmaveer Gad, just like at Sangameshwar.)  केली. टिळेकर यांच्या मागणीवर सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी सकारात्मक उत्तर देत स्मारक उभारण्याबद्दल लवकरच विचार करू, असे आश्वासित केले.
अहिल्या-सावित्रीचे स्मारक व्हावे
योगेश टिळेकर यांनी पुरवणी मागण्याच्या सत्रात विविध मुद्दे मांडले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणे, हा केवळ एका स्मारकाचा नाही, तर आपल्या गौरवशाली इतिहासाच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे महाराजांचा सन्मान करून त्यांचा जाज्वल्य इतिहास लोकांपुढे ठेवायला हवा, असे टिळेकर यांनी नमूद केले. पुणे शहरात महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी महाज्योतीचे केंद्र पुण्यात सुरु करावे. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शासनाच्या जागेवर अहिल्यादेवी व सावित्रीबाई या दोन्ही मातांच्या नावाने भव्य सृष्टी उभारावी, अशीही मागणी टिळेकर यांनी केली.
 
शिवाजीनगर-कोंढवा मेट्रो व्हावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते खराडी या मेट्रो मार्गांच्या विस्तारासाठी मंजुरी दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री अजित पवार यांनी खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या मेट्रोसाठी ८९०० कोटींची मान्यता दिली आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळही होऊ घातले आहे. अशावेळी शिवाजीनगर ते येवलेवाडी-कोंढवा मार्गाला मंजुरी द्यावी व कात्रज ते हडपसर या मेट्रो दोन्ही मार्गिकेचे काम सुरु करावे. 
 
भैरोबा नाला ते यवत उड्डाणपूल
‘एमएसआयडीसी’च्या वतीने ६५०० कोटी रुपयांच्या निधीतून चारपदरी मार्गाची निविदा प्रकाशित झाली आहे. ४० वर्षानंतर सोलापूर रस्त्याचे काम होणार आहे, याबद्दल सरकारचे अभिनंदन करतो. हडपसर ते यवत हा १८ किलोमीटरचा उड्डाणपूल भैरोबा नाला ते यवत असा २० किलोमीटरचा करावा, अशी माझी मागणी आहे. यामुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित क्रीडांगण सुरु करण्यास निधी मिळावा, अशी मागणी करतो.
 
महंमदवाडीचे महादेववाडी करा
पॉईंट ऑफ इन्फर्मेशनमध्ये मुद्दा उपस्थित करत योगेश टिळेकर यांनी महंमदवाडी गावाचे नाव बदलून महादेववाडी असे करण्याची मागणी केली. टिळेकर म्हणाले, गेली ३० वर्षे ग्रामस्थ महंमदवाडीचे नाव बदलण्याची मागणी करत आहेत. एकही मुस्लिम कुटुंब येथे नसल्याने १९९५ मध्ये गावाचे नाव महादेववाडी करण्यासाठी प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. मात्र, १९९७ मध्ये हे गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने नामांतर रखडले. स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, शासनाने यामध्ये लक्ष घालून मंहमदवाडीचे नाव महादेववाडी करावे, अशी मागणी करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *