आमदार योगेश टिळेकर यांची मागणी; गुरुवार पेठेतील अतिक्रमणांविरोधात सकल हिंदू समाजाचा रास्ता रोको
पुणे, दि.२९ – “गुरुवार पेठेतील मिर्झा मशीद ट्रस्ट, रजाशाह हॉल दर्गा, बलवार आळी जोग दर्गा, हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा येथील अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून येथील आरक्षित जागा पुणे महानगरपालिकेने तात्काळ ताब्यात घ्याव्यात,” अशी मागणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर ( Legislative Council MLA Yogesh Tilekar ) यांनी केली. या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
अतिक्रमणांविरोधात व हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवाजी रस्त्यावरील फडगेट पोलीस चौकीसमोर हजारो हिंदू बांधवांनी रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. विविध हिंदू संघटना, संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका प्रशासन लेखी निवेदनाद्वारे पंधरा दिवसात आरक्षित जागा ताब्यात घेऊ, असे आश्वासन देत नाही, तोवर रास्ता रोको सुरूच ठेवणार, अशी भूमिका घेतल्याने वाहतूकही खोळंबल्याचे पाहायला मिळाले. जवळपास अडीच ते तीन तास रास्ता रोखून धरला.
योगेश टिळेकर म्हणाले, “हा लढा कोणत्याही दर्ग्याच्या विरोधात नाही. ( This fight is not against any shrine. ) मात्र, त्याच्या आडून इथे होत असलेली अतिक्रमणे आणि त्यातून घडणाऱ्या राष्ट्रविरोधी घटना रोखण्यासाठी हा जनआक्रोश आहे. या परिसरात महानगरपालिकेचे भाजी मंडईचे आरक्षण आहे. मात्र, ४० वर्षांपासून पालिका येथील अतिक्रमणांवर कारवाई करत नाही व आरक्षित जागा ताब्यात घेत नाही. ही जागा ताब्यात घेऊन येथे नागरिकांसाठी भाजी मंडई उपलब्ध करून द्यावी. महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करतेय, याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे.”
“महापालिका प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेत तात्काळ कारवाई करावी. प्रत्येकवेळी पोलिसांना पुढे करून महापालिकेने याकडे दुर्लक्ष करू नये. अतिक्रमणे आणि त्याबरोबर होणाऱ्या राष्ट्रविरोधी घटनांना आळा घालण्यासाठी येथील हिंदू समाज जागरूकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,” असेही योगेश टिळेकर यांनी नमूद केले.
दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर योगेश टिळेकर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपल्याचे जाहीर करत सर्व हिंदू बांधवाना शांततेने घरी जाण्याचे आवाहन केले. पोलिसांच्या सहकार्याबद्दल टिळेकर यांनी त्यांचेही आभार मानले.