आरोग्य सुविधा सक्षम करण्याच्या मुकुल माधव फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक
पुणे, ता. ३० : मिस वर्ल्ड विजेती कॅरोलिना बिलावास्का आणि मिस इंडिया विजेती सिनी शेट्टी यांनी बुधवारी ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला (एनआयसीयू) भेट दिली. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या प्रयत्नातून समविचारी संस्थांच्या सहकार्याने उभारलेल्या या ‘एनआयसीयू’ आणि अन्य आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणाचे दोघीनींही कौतुक केले. बिलावास्का व शेट्टी यांच्यासह मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या प्रमुख जुलिया मोर्ले, पीएमई एंटरटेनमेंटचे संस्थापक सलमान अहमद, गायिका हदीस अहमद यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली. अहमद दाम्पत्याच्या सहकार्याने या भेटीचे आयोजन केले होते. रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या आधुनिकीकरणात घेतलेल्या पुढाकाराबद्दल मान्यवरांनी रितू प्रकाश छाब्रिया व मुकुल माधव फाउंडेशनविषयी गौरवोद्गार काढले.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर, ‘एनआयसीयू’चे प्रमुख डॉ. समीर पवार, मुकुल माधव फाउंडेशनचे जितेंद्र जाधव व योगेश रोकडे यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले व त्यांना सर्व उपक्रमांची माहिती दिली. डॉ. संजीव ठाकूर यांनीही मुकुल माधव फाउंडेशन व अन्य संस्थांच्या माध्यमातून ससून रुग्णालयातील आरोग्य सुविधा सक्षम झाल्याचे सांगितले. ‘एनआयसीयू’सह दंतरोग, एन्डोस्कोपी, यकृत प्रत्यारोपण अशा अनेक विभागांना सुसज्ज करण्याचे काम फाउंडेशनने केले असल्याचे ते म्हणाले.
कॅरोलिना बिलावास्का म्हणाल्या, “प्रथमच भारतात येत असून, भारतीयांकडून होत असलेल्या प्रेमपूर्वक स्वागताने भारावून गेले आहे. आज ससून रुग्णालयाला भेट दिली असून, येथील आरोग्य सुविधा पाहून मला खूप छान वाटले. सर्व डॉक्टर्स, नर्स व स्टाफ अतिशय नम्र व रुग्णांची काळजी घेणारा आहे. समाजातील गरीब व गरजू रुग्णांना देण्यात येणारी सेवा कौतुकास्पद आहे. आधुनिक, सुसज्ज अशा या सुविधा पाहता आल्याचा आनंद वाटतो. यासाठी आम्हाला शक्य तितके सहकार्य करणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद देते. त्यांच्या या अलौकिक आणि अवघड कामाचे कौतुक व्हायला हवे.”
ज्युलिया मोर्ले म्हणाला, “रितू छाब्रिया आणि फाउंडेशनच्या माध्यमातून खूपच भरीव आणि दर्जेदार काम उभे राहिले आहे. अशा विधायक कार्यात आपण योगदान देणे हे आपले कर्तव्य आणि सन्मान आहे. आम्हाला या कार्यात सहभागी व्हायला आवडेल, तसेच काही आर्थिक साहाय्य करण्याचाही प्रयत्न आहे. लहान बालकांना वाचवण्याचे मोठे काम ‘एनआयसीयू’द्वारे होत आहे. तेव्हा आपण सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करून समाजाच्या हितासाठी आवश्यक कार्य उभारण्याची गरज आहे.”
सिनी शेट्टी म्हणाली, “अतिशय चांगले काम आज पाहता आले. डॉक्टर्स, नर्स व सर्वच कर्मचारी रुग्णांची चांगली काळजी घेत आहेत. रुग्णालयात आलेल्या रुग्णाला आणि नातेवाईकाला दिलासा मिळेल, असे वातावरण येथे आहे. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासह फाउंडेशनने येथे नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय व अन्य सुविधा उभारल्याचे ऐकून समाधान वाटले.”