मासिक पाळी आरोग्य जागृतीसाठी महापारेषणचा पुढाकार : संदीप हाके
महापारेषण व त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनतर्फे किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन, समुपदेशन व प्रशिक्षण कार्यशाळा
पुणे : “मासिकपाळी स्त्रीत्वाचे लक्षण आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन झाले नाही, आवश्यक स्वच्छता जपली नाही, तर आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. त्यासाठी मासिकपाळी स्वच्छतेविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. या जनजागृती उपक्रमात महापारेषणचा नेहमीच पुढाकार राहील,” असे मत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) अधीक्षक अभियंता संदीप हाके यांनी व्यक्त केले. महापारेषण व त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून नाशिक व पुणे येथे प्रत्येकी १५० अशा एकूण ३०० कार्यशाळा आयोजिल्या जाणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
महापारेषण व त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनतर्फे विद्यार्थी सहायक समितीमधील किशोरवयीन मुलींसाठी आयोजित मासिकपाळी व्यवस्थापन आणि समुपदेशन व प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी संदीप हाके बोलत होते. प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे, महापारेषणचे सहाय्यक व्यवस्थापक प्रमोद गोडसे, एलडीसी सचिन मांडके, विद्यार्थी सहायक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या संस्थापिका प्रज्ञा वाघमारे, संचालक प्रशांत वाघमारे, प्रशासकीय अधिकारी वैष्णवी कारेगावकर, प्रशिक्षण प्रमुख सांची वाघमारे, पुणे जिल्हा समन्वयक रचना कांबळे, स्वीय सहाय्यक अर्चना बनकर आदी उपस्थित होते.
प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या, मासिकपाळी हे स्त्रियांना मिळालेले वरदान आहे. परंतु, गैरसमज, अंधश्रद्धा व चालत आलेल्या कुप्रथा यामुळे स्त्रियांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक भागात या काळात स्त्रियांना दुय्यम व हीन वागणूक दिली जाते. कुर्मा घरांसारखी पद्धत जीवघेणी ठरते. हे सगळे बंद होण्यासाठी मासिक पाळीविषयी जागृती होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन काम करत आहे. गडचिरोली, नंदुरबार, नाशिक, पुणे आदी ठिकाणी अशा कार्यशाळा घेतल्या जात आहेत.”
सविता नलावडे यांनी प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असताना मासिक पाळी आल्यानंतर त्या मुलीचा सोहळा साजरा केला जात असे. त्यातून त्याचे व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती व्हायची. मात्र, अलीकडे हा चांगला क्षण साजरा केला जात नाही. त्यामुळे मासिक पाळी आलेल्या मुलींना योग्य मार्गदर्शन करावे लागते.”
चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, “विद्यार्थी सहायक समिती परिवर्तनाचे केंद्र म्हणून काम करत आहे. येथील मुलींना आम्ही सातत्याने मासिक पाळीच्या संदर्भातही मार्गदर्शन करत असतो. ग्रामीण भागातून आलेल्या या मुली काहीशा लाजऱ्या असतात. मात्र, संस्थेतील उपक्रमांमुळे त्यांचा विकास योग्य मार्गाने होतो.”
यावेळी उपस्थित मुलींना मासिकपाळी व्यवस्थापनाची सचित्र माहितीपुस्तिका व सॅनिटरी पॅड्सचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेत प्रज्ञा वाघमारे यांनी मासिक पाळीविषयी समज-गैरसमज, अंधश्रद्धा, रूढी परंपरा याबाबत सखोल माहिती देण्यात आली. प्रमोद गोडसे, सचिन मांडके यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत वाघमारे यांनी आभार मानले.