पुणे: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी महेश शोभाबाई लहू म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी म्हेत्रे यांना नियुक्तीपत्र दिले आहे. महेश म्हेत्रे यांच्या निवडीमुळे प्रदेश युवक काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात संघटन विस्ताराला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महेश म्हेत्रे यांची ही नियुक्ती त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी संघटनात्मक कामगिरीची पावती मानली जात आहे. युवक काँग्रेसमध्ये त्यांनी तळागाळापासून काम करत आपले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. २०२३ साली प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्य पातळीवर विविध उपक्रम, बैठका आणि संघटनात्मक मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपला ठसा उमटवला आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील विविध महत्त्वाच्या मोहिमांमध्येही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. युवकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे युवक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे. या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. आगामी काळात युवकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करणार असल्याचा विश्वास म्हेत्रे यांनी व्यक्त केला आहे.
