पुण्यातील अवैध पब, डान्सबार, हुक्का पार्लरवर कारवाई करा

पुण्यातील अवैध पब, डान्सबार, हुक्का पार्लरवर कारवाई करा

रोहन सुरवसे पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे : कल्याणीनगर परिसरात घडलेल्या पोर्शे कार अपघातानंतर रात्री उशिरापर्यंत अवैधपणे सुरु असणाऱ्या पब, डान्सबार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, पार्टी क्लब्स आणि अमलीपदार्थ तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हुक्का, दारू आणि अमली पदार्थांचे सेवन करुन पब आणि बारमध्ये नशेत झिंगणाऱ्या तरुणाईला आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांना पोलीस प्रशासन आळा घालणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून अवैध पब, डान्सबार यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली.
 
या संदर्भांत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन सुरवसे पाटील यांनी निवेदन दिले. यावेळी सचिन मोरे, दीपक चौगुले, ज्ञानेश्वर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा, घोरपडी, विमाननगर व कॅम्प परिसरात मुख्यत्वे पब, हुक्का पार्लर आणि डान्सबार मोठ्या प्रमाणात आहेत. अमली पदार्थ तस्करीचे अड्डे देखील याच भागात आहेत. पोलीस प्रशासन मात्र हफ्ते घेऊन रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या व कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रोहन सुरवसे-पाटील यांनी केला.

रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, “देशाचे भविष्य असणाऱ्या तरुणाईला बरबादीच्या खाईत लोटणाऱ्या पब आणि पार्टी कल्चरला बंद करण्याची वेळ आली आहे. नाईट लाईफच्या नावाखाली तरुण-तरुणी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे जाऊन पब, क्लब आणि रेस्टॉरंटचे मालक कोट्यावधी रुपयांचा नफा कमावत आहेत. पोलीस प्रशासन हफ्ते घेऊन गप्प बसत असल्याने अवैध धंद्यांना कोणीच रोखू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील अवैध धंद्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. आठवडाभरात कारवाई झाली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत.”

————————–
जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिले आहे. आतापर्यंत पुणे शहरातील ५० पब व क्लबवर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, या निवेदनाची दखल घेऊन यापुढेही कारवाई सुरु ठेवणार असल्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, जोपर्यंत पुणे शहरातील पब संस्कृती पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत युवक काँग्रेसकडून पाठपुरावा सुरूच राहील. गरज पडल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
– रोहन सुरवसे-पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *