पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात हा सोहळा होईल.टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक तसेच टिळक स्मारक ट्रस्टचे व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी ही माहिती दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशिलकुमार शिंदे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार रजनी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. टिमवि ट्रस्टच्या टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन यावेळी वांगचुक यांच्या हस्ते होणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यालयाला बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी परवानगी असून सध्या तेथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु आहेत. टिमविच्या कुलगुरु डॉ. गीताली टिळक-मोने, टिळक महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रमुख व टिमवि ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक यावेळी उपस्थित असतील.
विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढीची केलेली घडण, लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा हिरीरीने पुरस्कार व प्रसार त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात घडवून आणलेले गुणात्मक बदल यासाठी सोनम वांगचुक यांची सन 2020 च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा होऊ शकला नव्हता. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. 1983 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यापूर्वी, एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ. कैलासावडिवू सिवन, बाबा कल्याणी, ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे संस्थापक डॉ. सायरस पुनावाला यांच्यासह अन्य दिग्गजांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतुःसूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे, असे नमूद करून डॉ. दीपक टिळक आणि डॉ. रोहित टिळक यांनी सांगितले की, लडाख सीमेवरील अलीकडच्या काळातील घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी उत्पादनांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सोनम वांगचुक यांनी स्वदेशीचा पुरस्कार हेच चीनच्या आव्हानाला खरे उत्तर ठरेल, अशी ठाम भूमिका मांडली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग जागतिक पातळीवर दखल घेणारे ठरले. स्थानिक समुदायाचा विकास करण्यासाठी त्यांनी राबविलेले अभिनव उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरले आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना होय!
टिळक पुरस्काराने गौरविण्यात येणार्या सोनम वांगचुक यांना अभिनव कल्पना आणि प्रयोगांसाठी जगभर ओळखले जाते. रॅमन मॅगसेसे पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी लडाखमध्ये लेह जिल्ह्यात झाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्यांनी मिळवली. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1988 मध्ये त्यांनी लडाखमधील सरकारी शाळांमधील व्यवस्थेत गुणात्मक बदल करण्याचे उद्दिष्ट ठेवून स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (सेकमॉल) ही चळवळ सुरु केली. या माध्यमातून वांगचुक यांनी सरकार, ग्रामीण समुदाय आणि नागरी समाज यांच्या सहकार्यातून शासकीय शाळांच्या व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी पुढाकार घेतला. सरकार, ग्रामीण समुदाय, नागरी समाज या तीन घटकांच्या समन्वयातून लडाखमध्ये ग्राम शिक्षण समित्यांची स्थापना झाली आणि या समित्यांकडे शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली. विद्यार्थ्यांना मैत्रीपूर्ण आणि संवादी रीतीने अध्यापन व्हावे यासाठी यामार्फत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर लडाखची स्थानिक ओळख अधोरेखित करण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन आणि प्रकाशन करण्यात आले. या बदलातून लडाखमधील दहावी परीक्षेतील उत्तीर्णतेचे प्रमाण अवघ्या सात वर्षांत पाच टक्क्यांवरून पंचावन्न टक्क्यांवर पोहोचले. आता हे प्रमाण तब्बल पंच्याहत्तर टक्के इतके आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सोनम वांगचुक यांनी लेहजवळ सुरू केलेले सेकमॉल पर्यायी शाळा केंद्र संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे ठरले. या विशेष शाळेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या विशेष शाळेतून मिळणार्या पाठबळ आणि प्रोत्साहनामुळे असंख्य विद्यार्थ्यांना स्वतःमधील कौशल्य सिद्ध करता आले. तेथील निर्मितीशील वातावरणामुळे ही कथित अपयशी मुले आपापल्या क्षेत्रात चमकू लागली. यातील अनेकांनी उद्योजक, चित्रपट निर्माता, राजकारणी, शिक्षक म्हणून जागतिक पातळीवर ख्याती मिळविली आहे. सेकमॉल शाळेत सोनम वांगचुक यांनी नवनिर्मितीचे धडे देत अध्यापन केले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी मातीचा वापर करून अतिशय कमी खर्चात वैशिष्ट्यपूर्ण इमारत उभी केली. सौर उर्जेचा वापर ही या इमारतीची ओळख आहे. लडाखमधील हिवाळ्यात बाहेर उणे 15 सेल्सिअस तपमान असताना या इमारतीतील तपमान 15 अंश सेल्सिअस एवढे राहते!
हवामानातील बदल आणि वेगाने वितळणारे हिमनग यामुळे लडाखमधील उंच पर्वतीय भागातील रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत होती. ती सोडविण्यासाठी वांगचुक यांनी कृत्रिम हिमनगांची निर्मिती केली. त्यांनी तयार केलेल्या ‘आइस स्तूप’द्वारे हिवाळ्यात वाया जाणारे पाणी प्रचंड आकाराच्या बर्फाच्या रुपात साठविणे शक्य झाले. उन्हाळ्यात ते वितळून तेथील शेतकर्यांची पाण्याची गरज भागविली जाते.
आशियाचे नोबेल ही ओळख असणार्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने 2018 मध्ये सोनम वांगचुक यांचा गौरव करण्यात आला. जम्मू आणि काश्मीर सरकारने 1996 मध्ये राज्यपाल पदक देऊन त्यांना सन्मानित केले. सामाजिक उद्यमशीलतेसाठी 2017 मध्ये त्यांना ‘दि जीक्यू मेन ऑफ दि इयर’ पुरस्कार तर अमेरिकेत 2016 मध्ये दि रोलेक्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युनेस्कोच्या अध्यासनातर्फे ‘दि टेरा अॅवॉर्ड’ त्यांना देण्यात आले. सँक्च्युरी एशिया मॅगझीन, दि वीक यांनीही वांगचुक यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार दिले. सीएनएन आयबीएन वाहिनीचा ‘रिअल हिरोज्’ पुरस्कार त्यांना मिळाला आहे.