प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील योगदान
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना वैश्विक स्तरावरील सर्वात मोठी सेवा संस्था असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले. ‘लायन्स क्लब’चे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी यांनी प्रा. डॉ. चोरडिया यांना सभासदत्वाचे मानपत्र प्रदान केले. प्रसंगी संगणक तज्ज्ञ व रोटरी क्लब इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर, ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते. लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या शताब्दी सोहळ्यात डॉ. चोरडिया यांना ‘लायन्स सेंटिनिअल पुरस्कार’, तसेच ‘लायन्स समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.
डॉ. चंद्रहास शेट्टी म्हणाले, “सूर्यदत्ता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण व सामाजिक क्षेत्रात प्रा. डॉ. चोरडिया यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांचे सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने त्यांना मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले आहे. येत्या काळात सूर्यदत्ता ग्रुप व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या एकत्रित प्रयत्नातून आणखी भरीव सामाजिक कार्य केले जाईल.”
डॉ. दीपक शिकारपूर यांनी डॉ. संजय चोरडिया यांचे अभिनंदन केले. प्रखर सामाजिक जाणीव आणि जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉ. चोरडिया यांचा हा उचित सन्मान आहे. जागतिक स्तरावरील सामाजिक संस्था असलेल्या लायन्स क्लबकडून त्यांना आपले सामाजिक कार्य विस्तारण्याची एक नामी संधीच मिळाली आहे. त्यांच्याकडून असेच उल्लेखनीय सामाजिक कार्य होत राहील.”